अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नालेगाव येथे लोकमंगल गृहनिर्माण संस्थेमध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याची फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कैलास नामपेल्ली उषाकोयल (रा. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सॉसाइटी, नगर), अशोक बाळू पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्यांच्या पत्नी यांच्याकडून प्लॉट देण्याच्या बहाण्याने 3 लाख रुपये, लक्ष्मण राजण्या यांच्याकडून 3 लाख रुपये आणि शशिकला मिटानी यांच्याकडून 1.25 लाख रुपये, असे एकूण 7 लाख 25 हजार रुपये आरोपींनी घेतले. मात्र, आजतागायत कोणताही प्लॉट देण्यात आलेला नाही, तसेच पैसेही परत न करता विश्वासघात केला गेला.
ही फसवणूक दिनांक 1 मार्च 2012 पासून सुरू होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर 12 जून 2025 रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अजूनही इतर अनेक लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत असून, पो.हे.का. कृष्णकुमार शेडवाड तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.