वडनेर हवेली येथे जलयुक्त शिवार अभियानाचे उद्घाटन
पारनेर | नगर सह्याद्री
जलयुक्त शिवार अभियान हे गावाच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. वडनेर हवेलीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन या अभियानाला यशस्वी करावे. शासनाच्या या योजनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि गावकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते, भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी वडनेर हवेलीचे सरपंच लहु भालेकर, तालुका कृषी अधिकारी घुले, कृषी अधिकारी साबळे, माजी सभापती गणेश शेळके, दत्ता नाना पवार, राजीव सोनुळे, भरत गट, मोहन भालेकर, विष्णु वाळुंज, स्वप्निल भालेकर, तात्याभाऊ भालेकर, गणेश मेजर भालेकर, विक्रम भालेकर, शरद भालेकर, सुनील बढे, भाऊसाहेब सोनुळे, उत्तम भालेकर, दत्तू भालेकर, विजय भालेकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण सहकारी आणि वडनेर हवेलीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी आमदार काशिनाथ दाते यांनी या अभियानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनीही शासनाच्या या योजनेला गावकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे सांगितले.
सरपंच लहु भालेकर यांनी गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जलयुक्त शिवारअभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत व्यक्त केले.
कृषी अधिकाऱ्यांनी योजनेच्या तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत, गावात पाण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली. कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हा कार्यक्रम गावातील एकजुटीचे आणि विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरला. जलयुक्त शिवार अभियानामुळे वडनेर हवेली गावात पाण्याची उपलब्धता वाढण्यासह शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.