सारीपाट / शिवाजी शिर्के
संजय राऊत यांच्यासाठी साजन पाचपुते ‘जे’ करतोय ‘ते’ नगरकर शिवसैनिक कधी करणार? अनुराधा नागवडेंसाठी खा. नीलेश लंके कसे झाले अनुकूल? / श्रीगोंद्यातील खोक्यांसाठी नगर शहरातील शिवसैनिक वार्यावर | खोक्यांच्या सौद्यातील उमेदवारीसाठी राहुल जगताप यांना शरद पवारांनीही सोडले वार्यावर!
बारामतीहून परतत असताना दौंड रस्त्यावरील काष्टी चौकातून ढोकराईकडे जात असताना बाप्पाचं दर्शन झालं. बाप्पाला पाहून मीही थबकलो!
मी- बाप्पा, इकडं कुठं रे?
श्रीगणेशा- वामकुक्षी झालीय आत्ताच! जरा पाय मोकळे करावं म्हणून शतपावली करतोय!
मी- बाप्पा, किती खोटं बोलणार! निवडणुकांचा माहोल चालू आहे! पाचपुतेंच्या विरोधात कोण याकडं नजरा लागल्या असताना नागवडेंना मशाल चिन्ह मिळालंय! चालुक्य या राजघराण्यात जन्माला आलेल्या अनुराधा वहिनींची उमेदवारी जाहीर झालीय! राजू दादा, मोठ्या आवाजात उद्धवसाहेबांच्या नावानं घोषणा देत मुंबईतून निघालेत! हे सारं असताना तू वामकुक्षी, शतपावली असं न पटणारं बोलतोस!
श्रीगेणशा- पटणारं तुम्ही मंडळीच बोलू शकतात का? कालपर्यंत अजितदादा, त्याच्या आधी बाळासाहेब थोरात, त्याच्या आधी देवेंद्रजी अन् नरेंद्रभाई यांच्या नावानं घोषणा देणारे तुमचे हेच राजू दादा आज उद्धवजींच्या नावानं घोषणा देताना पाहून तुमच्या पोटात का दुखू लागलंय!
मी- बाप्पा, कोणाच्याच पोटात दुखत नाही बरं! लढत तर पाचपुते- नावगडे यांच्यातच होणार आहे ना! फरक इतकाच की यावेळी दोन्ही घरातील महिला आहेत! बाप्पा, आमच्या राजू दादानं वहिनीसाठी तिकीट आणलंच बरं का!
श्रीगणेशा- (मोठ्यांदा हसला) कोणी आणलं तिकीट? अरे साजन पाचपुतेच्या जनमनातील उमेदवारीचा कौल की स्कीन करन्सीतील सौदा!
दहिहंडी कार्यक्रमाला राजूदादानं मदत केली त्याचवेळी हे सारं कसं फिक्सींग झालंय याची चर्चा झडलीय! तुमच्या राजू दादाला वाटलं श्रीगोंद्यातील जनतेला वेड्यात काढू! पण, तसं नाही बरं का! दहिहंडीनंतरच्या गणेशोत्सव अन् नवरात्रीच्या कार्यक्रमांसाठी याच साजनला याच राजूदादानं पुढं केलं. साजनचा आणि आपला काहीच संबंध नाही असं दाखवताना राजूदादा पडद्याआड सोेंगट्या हलवत राहिले. सांगलीच्या निमित्ताने थेट किचन मेंबर झालेल्या साजनला हाताशी धरुन याच राजूदादाने संजय राऊत यांना गाठलं! श्रीगोंद्यात शिवसेनाच लढणार हे राऊतांनी खूप आधीच जाहीर केले होते. त्याचवेळी ‘टोकन’ घेऊन झाल्याची चर्चा आता रंगलीय! आता कालच्याला फक्त त्याची घोषणा झाली इतकंच!
मी- बाप्पा जाऊ दे ना! नागवडेंना उमेदवारी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे.
श्रीगणेशा- मोठी डिल झाल्याची चर्चा आहे. साधं शिवसैनिक नसणार्यांना अशी अचानक उमेदवारी मिळतेच कशी? त्यासाठी म्हणे पंधरा खोकी द्यावी लागली. स्कीन करन्सीतील वाटा तर आणखी वेगळाच! मटक्याचा आकडा आता अधिक गतीमान झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नकोस! दोन तासात नागवडेंना शिवबंधन बांधले जाणे आणि दुसर्या मिनिटाला उमेदवारीचा एबी फॉर्म मिळणे हे फक्त आणि फक्त मातोश्रीवरच होेऊ शकते. महाविकास आघाडीत उमेदवारी देताना इलेक्टींग मेरीट पाहिले जाते असं बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात इथे वेगळ्याच करंन्सीचं मेरीट पाहिलं गेल्याची चर्चा झडतेय! कोणताही मोठा जनाधार नसलेला पोरगा उपनेता होण्यासाठी नाजूक संबंध जपतो हेही समजून घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे जनाधार नसला तरी चालेल, पण नाजूक संबंध जपण्यासाठी मेरीट असलं की तुम्ही कोणत्याही बड्या नेत्याला लिलया वाकवू शकता हे काल समस्त शिवसैनिकांनी पाहिलं! शिवसेना संपविण्याच्या अनुषंगाने जे आरोप झाले, त्यात हा जुनाच आरोप! मात्र, असं असताना आजही त्याच वाटेने उद्धवाचा प्रवास चालूच असल्याचे समोर येत आहे.
मी- बाप्पा, पवार साहेबांनी या जागेचा आग्रह धरला होता हे खरे आहे का रे?
श्रीगणेशा- पवारांनी आग्रह धरला असता तर हे असे झालेच नसते! राहुल जगतापच आमचा उमेदवार हे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यापासून ते शरद पवारांंपर्यंत सारे सांगत होते. तरी देखील ही जागा सेनेकडे गेली. याचाच अर्थ राहुल जगताप यांचं नाव पुढे केले गेले आणि त्याबदल्यात पवारांनी आणखी काही पदरात पाडून घेतले! आता त्यावर बोलण्यात अर्थ नाही! पण, लोकसभा निवडणुकीत याच अनुराधा नागवडे भाजपाच्या सुजय विखे यांच्या सोबत होत्या! त्याच नागवडे आता मविआच्या उमेदवार झाल्या आहेत. ठाकरे गटाची उमेदवारी असली तरी त्यासाठी मुंबईकडे रवाना होण्यासाठी बाबासाहेब भोस यांच्या घरात नीलेश लंके आणि नागवडे पती-पत्नींनी यांच्यात बैठक झाली आणि याच बैठकीत लंके यांचा होकार नावगडे यांनी मिळवला. भोसांच्या बाबासाहेबांना याची मोठी बक्षिसी मिळाल्याचीही चर्चा आहे. उबाठा गटाची उमेदवारी नागवडेंची असली तरी त्यासाठी खासदार लंके यांचा होकार देखील मिळवावा लागला! हा होकार मिळवण्यासाठी काय- काय झाले हे यथावकाश मी जाहीरपणे सांगेल! मात्र, नगरचाच विचार केला तर श्रीगोंदा ताब्यात घेऊन मोठा ‘मलिदा’ मिळाला अन् दुसरीकडे नगर शहराची हक्काची समजली जाणारी जागा सोडली गेल्याचे वरकरणी दिसणारे चित्र देखील साफ खोटे आहे. नगर शहराच्या जागेसाठी स्वत: उद्धवजींसह संजय राऊत हे देखील फारसे आग्रही नव्हते.
या दोघांनी मिळून नगर शहरातील शिवसेना पदाधिकार्यांना चॉकलेट दिले. नगरमध्ये ही मंडळी चॉकलेट चघळत बसली अन् तिकडे संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने नगरकर शिवसेना पदाधिकार्यांच्या पेकटात लाथ घालावी अशी चाल खेळली आणि अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर केली. वास्तविक पाहता नगर शहर ही हक्काची जागा असताना त्यावर दावा न करता, त्यावर एक शब्दही न बोलता संजय राऊत श्रीगोंद्यासाठी इतके आग्रही का झाले होते याचे उत्तर आता नगर शहरातील शिवसैनिकांना साजन पाचपुते याने दिलेय! साजनकडून शिकण्यासारखं खूप काही असल्याचं आता नगरकर शिवसेना पदाधिकारी बोलत असले तरी संजय राऊत यांच्यासाठी साजन पाचपुते जे करत आला, जे करणार आहे ते नगरकर पदाधिकारी करुच शकत नाहीत! बबनरावांचा पुतण्या एवढीच ओळख असताना साजन पाचपुते हा थेट शिवसेनेत प्रतिष्ठेच समजले जाणार्या उपनेता पदावर बसला! साजन उपनेता झाल्याच्या बातम्या आल्यावरच श्रीगोंद्यातील जुन्या शिवसैनिकांना समजले की साजन शिवसेनेत आलाय! त्याआधी याच साजन पाचपुते याने जुन्या शिवसैनिकांना काष्टीच्या चौकात उभा राहून शिव्यांची लाखोली वाहिली अन् प्रसंगी गुद्दागुद्दीही केली! आता हाच साजन नगर जिल्ह्याची सुत्रे हाती घेऊन सार्यांना वाकुल्या दाखवतोय! राहुल जगताप यांनी कठिण प्रसंगात शरद पवारांच्या चरणी निष्ठा ठेवली आणि त्याच राहुल जगताप यांना याच साजन पाचपुतेने निष्ठेपेक्षा ‘स्कीन’ इफेक्ट किती खतरनाक काम करतो हे दाखवून दिले. राहुल जगताप यांच्या हातातोंडाशी ओलेला उमेदवारीचा एबी फॉर्म गेला असला तरी जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून त्यांना यानिमित्ताने सहानुभूती मिळाल्यास आश्चर्य वाटू नये! चल, निघतो मी, पुन्हा भेटू… काष्टीच्या बाजारपेठेचा कानोसा घ्यायचा म्हणून इकडे आलोय! शतपावलीसाठी नाही, असं म्हणून बाप्पा पाठमोरा झाला!
(बाप्पा दिसेनासा झाला! स्कीन करन्सीची नक्की काय भानगड आहे, त्यातून काय काय आणि कोणत्या-कोणत्या उलाढाली झाल्या असतील याचा अंदाज बांधत निघालो. याबद्दल बाप्पाला पुढच्या भेटीत विचारायच हे ठरवून मी ढोकराई फाट्यावरुन श्रीगोंदा कारखान्याच्या दिशेने मार्गस्थ झालो! कारखान्यातील कर्मचारी आणि शिक्षण संस्थेतील कर्मचार्यांची नक्की काय मते आहेत हे जाणून घेण्यासाठी मी देखील अतूर झालो होतो.)