बीड । नगर सहयाद्री:-
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 18 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात सतत गंभीर आरोपही केले जात आहेत. त्यामध्येच आता संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागल्याचे बघायला मिळत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या, असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय.
उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चाबद्दल बोलताना आमदार संदीप क्षीरसागर हे म्हणाले की, ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळी मी गावात गेलो. लोकांनी मला आरोपींची नावे सांगितली. ते घाबरलेले होते पण त्यांच्या बोलण्यात एक रोष होता. ज्या लोकांची त्यांनी नावे सांगितले त्यांची कशी दहशत आहे, हे देखील त्यांनी सांगितले.
हा फक्त त्या गावापुरता नाहीतर पूर्ण जिल्हात रोष होता. न्याय मिळवून देण्यासाठी उद्याचा मोर्चा असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. उद्या 28 तारीख आहे. इतके दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक करण्यात आली नाही. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरही संदीप क्षीरसागर यांच्याकडून टीका करण्यात आली. क्षीरसागर म्हणाले, एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात की, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
पूर्ण जिल्हा म्हणतो की, या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला ताब्यात दिले पाहिजे ना! पूर्ण जिल्हा म्हणतोय तोच मास्टरमाइंड आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. काय चुकीचे आहे या मध्ये? जिल्ह्यात खोटे गुन्हे देखील दाखल केले जात असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. बीडच्या घटनेबद्दल बोलताना धनंजय मुंडे यांनी काल म्हटले होते की, गुन्हेगार कोणीही असो त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझे राजकारण आणि समाजकारण संपवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत.