इंदापूर / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,’जनतेच्या मनात एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. मी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनीही मला सांगितले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. असेही पाटील यांनी सांगितले. तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार हे आता निश्चित झालं आहे.
पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
तत्पूर्वी, हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे या देखील भाजपच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार आहेत.याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, साहेबांनी शरद पवार पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील असेही अंकिता पाटील म्हणाल्या. भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा देणार असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या.
दरम्यान, महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील 5 वर्ष या मतदारसंघात तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला आहे. हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरु होती. त्यात आज सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्ष प्रवेशानंतर इंदापूरात हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. लोकसभेवेळीच विधानसभेचा शब्द द्या अशी भूमिका तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून घेतली जात होती. स्वत: फडणवीस यांनी इंदापूरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला.
कार्यकर्त्यांकडून तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह –
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायचीच असा चंग हर्षवर्धन पाटील यांनी बांधला आहे. त्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्या असा आग्रह धरण्यात येत होता.
हर्षवर्धन पाटील यांच्याआधी अंकिता पाटील यांचा भाजपाला राम राम
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आधी भाजपाला राम राम केला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात जात असल्याचं जाहीर केलं. त्याआधी त्यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. मात्र अंकिता पाटील यांनी आधीच आपण भाजपा सोडल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होणार हे निश्चितच मानलं जात होतं जो आता झाला आहे.
अंकिता पाटील नेमकं काय म्हणाल्या?
अंकिता पाटील म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील असेही अंकिता पाटील म्हणाल्या. भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा दिला आहे असं अंकिता पाटील यांनी सांगितलं. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या. तसंच हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या. त्यांनी भाजपाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे असं माध्यमांना हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका जाहीर करण्याआधी सांगितलं.