नागपूर | नगर सह्याद्री
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फुके यांनी म्हटलं की, मनोज जरांगे यांचा रिमोट शरद पवार यांच्या हाती आहे.
शरद पवार जितके चाबी भरणार, तितके जरांगे बोलतात. त्यांनी जरांगे यांच्या गोवा येथील ओबीस अधिवेशनावरील आरोपांना खोडून काढत, त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. फुके यांनी जरांगे यांची विश्वासार्हता संपल्याचंही म्हटलं, आणि पावसाळा आला की बेडूक बाहेर येतात, तसे निवडणुका आल्या की जरांगे बाहेर येतात, असा टोमणा मारला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
फडणवीस मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना परिणय फुके यांनी फडणवीस यांची पाठराखण केली. मराठ्यांना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. जरांगे यांना कदाचित मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं वाटत असावं, किंवा त्यांना मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करायची आहे, अशी शंका फुके यांनी व्यक्त केली. त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे.
शरद पवार यांच्यावर थेट हल्ला
प्रणय फुके यांनी शरद पवार यांच्यावरही थेट हल्ला चढवला. शरद पवार यांचं राजकारण नेहमीच ओबीसी विरोधी राहिलं आहे. त्यांनी मराठा समाजाचा आधार घेऊन ओबीसी समाजाविरुद्ध राजकारण केलं. जरांगे यांच्या आंदोलनामागेही शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, हे राज्याला कळून चुकलं आहे, असं फुके यांनी म्हटले आहे.