नाशिक / नगर सह्याद्री
गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यात मराठवाड्यातील प्रमाण सर्वाधिक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिक येथील शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलताना पवार यांनी शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. “बळीराजा उपाशी राहू नये, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. पण ‘देवाभाऊ’ फक्त होर्डिंग्ज आणि पोस्टरबाजीपुरते मर्यादित राहिले,” असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
शेतकऱ्यांचे संकट आणि सरकारचे अपयश
पवार यांनी मेळाव्यात सांगितले की, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. “शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन जीव देत आहे, तरीही राज्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि त्याकडे सरकारचे दुर्लक्ष यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संकटकाळात शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे, पण सध्याचे राज्यकर्ते ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत,” असे पवार यांनी ठणकावले.
यूपीए काळातील कर्जमाफीची आठवण
शरद पवार यांनी यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांचा दाखला दिला. “मी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्यांच्या घटना समोर आल्या. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती करून आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळ येथे जाऊन शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांच्या बायकांनी सांगितले की, सहकारी संस्था आणि खासगी सावकारांचे कर्ज थकल्याने त्यांचे पती जीवन संपवत आहेत. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे, यावर उपाय म्हणून आम्ही ७०,००० कोटींची कर्जमाफी जाहीर केली,” अशी आठवण पवार यांनी सांगितली. सध्याच्या सरकारकडे अशा ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांचे नुकसान
नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवरही पवार यांनी भाष्य केले. “नाशिकचा कांदा जगभरात पोहोचतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शेतकरी आपल्या मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्ने करतात. पण सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. येथे योग्य भाव मिळत नाही आणि बाहेर विक्रीलाही परवानगी नाही. हीच परिस्थिती सोयाबीन आणि इतर पिकांची आहे,” असे ते म्हणाले. सरकार शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला.
‘देवाभाऊ’ आणि शिवाजी महाराजांचा आदर्श
पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ‘देवाभाऊ’ असा उल्लेख करत थेट निशाणा साधला. “राज्यात सर्वत्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन होर्डिंग्ज आणि पोस्टरबाजी सुरू आहे. पण शिवरायांचा खरा आदर्श कोणता? बळीराजा उपाशी राहू नये, हा! पण देवाभाऊ या आदर्शापासून दूर गेले आहेत,” अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही, तर यापुढे मोर्चे आणखी तीव्र होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
नेपाळ प्रकरणावर सूचक वक्तव्य
नेपाळमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत पवार यांनी सूचकपणे सांगितले, “नेपाळमध्ये काय घडले, त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण देवाभाऊ यातून शहाणपण घेतील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.” या वक्तव्यातून त्यांनी सरकारला शेतकरी प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला.