निघोज । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात व सर्वत्रच सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून उन्हाळ्याच्या तडाख्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीनी तळ गाठल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे चारा पिके ही जळून जाऊ लागली आहेत त्यामुळे पारनेरकरांना कुकडीच्या आवर्तनाची आस लागून राहिली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून कुकडी पट्ट्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. उन्हाचा तडखा इतका वाढला आहे की चाऱ्या ऐवजी रणरणत्या उन्हात जनावरे पाणीच जास्त मागू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर पाणी टंचाई चे मोठे संकट उभे राहिले असून येत्या दहा तारखे पर्यंत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांनी जनावरांसह आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा जनतेतून देण्यात आला आहे. माजी चेअरमन प्रदीप सोमवंशी, संतोष पठारे ,पारनेर बाजार समिती संचालक संदीप सालके ग्रा सदस्य कानिफनाथ पठारे. पंढरीनाथ कवास्टे, संतोष सालके, माजी सरपंच सुभाष आढाव यांनी दिला आहे.
पाण्यासाठी पारनेरकर नेहमीच अकार्यक्षम आहेत अनेक वर्षांपासून अनेकांनी बोलघेवडे राजकारण केले पण पाणी मात्र पारनेर करांना वेळेत कुणीच पाजू शकले नाहीत सर्वसामान्य नेहमीच आंदोलने इशारे रस्ता रोको आदी करूनच कुंभकर्णी प्रशासनाला जागे करावे लागले तेव्हा कुठे पाणी मिळायचे. कालवा असूनही हक्काचे पाणी मिळविता येत नसेल तर पारनेरकरांचे यापेक्षा दुर्दैव कोणते आहे.
सर्वपक्षीय नेत्यांचे लोकांच्या प्रश्नकडे सोयीस्कर दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असावे किंवा पुणेकर नगरकरांना वरचढ म्हणावे लागतील कारण ते न चुकता पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी तर सतत आटोकाट प्रयत्न करताना नेहमी दिसतात हा त्यांचा कदाचित आवडता छंद झाला असावा असे दिसते. तालुक्यात सर्व राजकारन्यांची सारखीच परिस्थिती झाली असून हक्काच्या पाण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाहीत समन्वयी पाणी वाटपाचा ही विसर त्यांना पटकन पडतो या बाबत शेतकऱ्या मध्ये मात्र नाराजी चा सुर आहे. तहाणलेल्या जनतेला जास्त वेठीस न धरता येत्या दहा तारखेपर्यंत कुकडी कालव्यातुनपाणी सोडावे अशी मागणी होत आहे.
कुकडी कालव्यातुन आवर्तन केव्हा सुटणार या बाबत कोणतीच ठोस माहिती देण्यास पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवत अजून वीस दिवस तरी पाणी मिळणार नसल्याचे खाजगीत त्यांनी सांगितले पण नाव नका छापू म्हटले..,,याचा अर्थ अजून पाटबंधारे खात्याकडून आवर्तन सोडण्याविषयीच्या कोणत्याच हालचाली नसल्याचे स्पष्ट होत असून जनतेचा पाण्यावाचून अजून पंधरा ते वीस दिवस तरी घसा कोरडा राहणार आहे.
-शेतकरी, प्रदीप सोमवंशी
- आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बहुतांश धरणे असल्याने आमच्या जमीनी यामध्ये गेल्याने या पाण्यावर आमचाच अधिकार अशी ओरड जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पुढारी सातत्याने करीत असतात मात्र ज्यांच्या जमीनी धरणात गेल्या आहेत त्यांचे पुनर्वसन पारनेर तालुक्यातील बहुतांश विशेष करुण जवळा, निघोज, गुणोरे ,गाडीलगाव व ईतर गावांत जमीणी व घरे देउन झाली असल्याने तेवढाच अधिकार पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा असल्याने जेवढे पाणी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे तेवढेच पाणी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ही जनतेची मागणी रास्त आहे.