सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरात उभारण्यात येत असलेल्या अग्निशमन दलाचे काम अंतिम टप्प्यात असून, सध्या 80 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे अग्निशमन केंद्र संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरेल, असा विश्वास सागर भास्करराव मैड यांनी व्यक्त केला.
बुधवार (दि. 30 जुलै) रोजी अग्निशमन दलाचे एक वरिष्ठ अधिकारी सुपा येथे भेट देऊन कामाची पाहणी करून गेले. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्ता व गतीबाबत समाधान व्यक्त केले. सागर मैड यांनी त्यांच्यासोबत तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांचा दूरध्वनीवरून संवादही साधून दिला. लवकरच हे अग्निशमन केंद्र लोकसेवेसाठी सुरू होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सुपा एमआयडीसीतील हे अग्निशमन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारले जात आहे. दोन एकर क्षेत्रावर हे केंद्र विकसित होत असून, येथे 28 रहिवासी अग्निशमन जवान, दोन अधिकारी यांच्यासाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. सुरुवातीला दोन अग्निबंब गाड्या, एक अॅम्बुलन्स, एक बोलेरो जीप यासह एकूण चार वाहने कार्यरत असणार असून, भविष्यात अधिक गाड्यांचा समावेश केला जाणार आहे.
अग्निशमन केंद्रासाठी 2017 पासून पाठपुरावा
सुपा परिसरात अग्निशमन दलाची आवश्यकता असल्याची जाणीव 2017 पासून सागर मैड यांनी सातत्याने मांडली होती. अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने सहकार्याने अग्निशमन दलाचे काम पूर्णत्वास येत असल्याचे सागर मैड यांनी सांगितले.