पावसामुळे शेती पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
पारनेर / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेत तहसीलदार सौ. गायत्री सौंदाणे यांच्यासह प्रशासनाने खडकवाडी, पळशी परिसरात नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. तालुक्यातील सर्व तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार कामाला गती मिळाली आहे.
अतिवृष्टीमुळे शेती, पिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना नुकसानीची तात्काळ माहिती महसूल किंवा कृषी अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शासनाकडे अहवाल पाठवणे सुलभ होईल आणि पीडितांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड, गणेश हाके, बन्सी गागरे, संपत जाधव, विकास हिंगडे, आदी पळशी व खडकवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार गायत्री सौंदणे यांनी या संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्रशासकीय अधिकारी म्हणून मी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तुमच्या सोबत आहे. आम्ही नुकसानग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करू. प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत व नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी नुकसानीची माहिती त्वरित नोंदवावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरपंच प्रकाश राठोड यांनी शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा..
खडकवाडी, पळशी या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे बाजरी, कांदा, टोमॅटो, मिरची, फुल शेती पूर्ण उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका सरपंच प्रकाश राठोड यांनी तहसीलदार यांच्यासमोर मांडली.
तहसीलदारांचे प्रशासनाला आदेश..
पारनेरच्या सर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तहसीलदारांनी पाहणी केली असून तहसीलदारांनी प्रशासकीय अधिकारी व कृषी विभाग यांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.