पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील रोकडे वस्ती वर दुर्दैवी घटना घडली गुरुवार दि. 16 रोजी सायंकाळी 7:15 च्या सुमारास नऊ वषय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ईश्वरी पांडुरंग रोहकले (वय 9, रा. खडकवाडी, ता. पारनेर) असे मृत मुलीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहकले गुरुवारी सायंकाळी सात वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत होते.
मुलगी ईश्वरी हिने घराबाहेर लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगितले. त्याचवेळी घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला. तिला थेट मक्याच्या शेतामध्ये ओढत नेले, तिने आरडाओरड केली. पडवीत बसलेल्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला. त्यांनी मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिले.
नरभक्षक बिबट्या तिच्याजवळ आढळून आला. वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली. त्यानंतर बिबट्या पळून गेला. हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात मुलीची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.
वनविभाग,पोलीस यांच्या वतीने संयुक्त पंचनामा करणार आहेत. घटनेची माहिती आमदार काशीनाथ दाते यांना कळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे व स्थानिक पोलिसांना सूचना केल्या. तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावण्याचीही सूचना केली. कु. ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात मुुलीचा मृत्यू; सुजित झावरेेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. कु. ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी घेतली कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी याबाबत सरकाराकडे पाठपुरावा करून 10 लाख रुपये मदत मिळवुन देणार असल्याचे सांगितले. तसेच अनेक दिवसांपासुन पारनेर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तक्रार करुनही वन खाते मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे, याचे दुःख व्यक्त केले. यावेळी उपसरपंच शरद गागरे, शरद पाटील, शिवाजी शिंगोटे, सुभाष शिंदे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, किसन आहेर आदीं उपस्थित होते. दरम्यान, या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ज्यांची मुले, मुली गावाबाहेरील वस्तीवरून प्राथमिक, माध्यमिक शाळेत येतात त्या विद्याथ आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करा; ग्रामस्थांची मागणी
खडकवाडी, म्हसोबा झाप, देसवडे, मांडवे खु. या परिसरामध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. दोन महिन्यांपासून खडकवाडी येथील गणपती मळा येथे बिबट्याचे पिलासह वास्तव्य आहे. या संदर्भात दोन महिन्यांपूव वनविभागाकडे लेखी तक्रारही केली. याच वस्तीवरील बबन रोहकले यांच्या मालकीच्या दोन मेंढ्यांवर बिबट्याने हल्लाही केला होता. याबाबत टाकळी ढोकेश्वर 2 वनविभागाच्या वतीने पंचनामाही केला होता. त्यामुळे नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी विकास रोकडे, डॉ. विनायक दातीर, ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.