पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी रस्त्यालगतच्या बारामती ॲग्रो परिसरात सोमवार (दि. ८ सप्टेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. अमन पन्नूलाल खोटे (वय ३ वर्षे, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत बालकाचे नाव आहे. अमनचा परिवार हा परप्रांतीय मजुरांचा असून, बारामती ॲग्रो परिसरात काम करत होता. अमन हा लघुशंकेसाठी घराबाहेर पडला असता, आईच्या डोळ्यांसमोरच बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी आठ वाजता घटनास्थळापासून सुमारे १ किमी अंतरावर जंगलात झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळून आला.
शोधमोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर, अंकराज जाधव यांनी सहभाग नोंदवला होता. ही घटना घडण्याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी, २ सप्टेंबर रोजी कळस येथेही बिबट्याच्या हल्ल्यात एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. आठवड्याभरात झालेल्या दोन घटनांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंजरे लावून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. तसेच गस्त वाढवण्यात आली असून, वन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे, तसेच लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही चिंता वाढली आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक ठरत आहे. वन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा तपास सुरू असून, परिसरात सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दोन्ही घटनांमुळे भीतीचे वातावरण
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कळस येथे २ सप्टेंबर रोजी गणेश गाडगे या युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू, तर ८ सप्टेंबर रोजी पारनेर शहरालगत तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकाच आठवड्यात दोन जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,वनविभाग नेमका काय करत आहे? असा सवाल नागरिक करत आहे. बिबट्याच्या हलक्या हालचालींवर आधीच लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना केली गेली असती, तर कदाचित या घटना टळू शकल्या असत्या, अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.
सुप्यात बिबट्याचा वावर; ठोस उपाययोजनांची गरज
गेल्या चार दिवसांपासून सुपा व पारनेर शहरांमध्ये बिबटे फिरताना दिसून आले होते. यामध्ये सुपा येथील एक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले. मात्र या भागात आणखी एका बिबट्याचे दरर्शन नागरिकांना झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, फक्त सूचना पुरेशा नाहीत, तर बिबटे आढळलेल्या भागांमध्ये अधिकाधिक पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
वनविभागाची निष्क्रियता उजेडात
पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तसेच उत्तर पट्ट्यात व पारनेर शहरात आणि सुपा शहरांमध्ये बिबटे आढळून आले. नगर सह्याद्रीने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर वृत्तपत्रांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु वनविभागाला अजून जाग आलेली नाही. पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबटे पकडण्यासाठी खास मोहीम राबवण्याची गरज आहे. एकाच आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे वन विभागाची निष्क्रियता उजेडात आली आहे.