संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती
पारनेर । नगर सहयाद्री:-
सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन. २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात रुपये ४ कोटी ४३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली. संस्थेच्या मार्च २०२५ अखेर २०९ कोटी ८४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भांडवल रु. २४७ कोटी २२ लाख आहे. वसूल भाग भांडवल रु. ६ कोटी १० लाख राखीव व इतर निधी रु. २६ कोटी २८ लाख आहे.
संस्थेचे कर्ज वाटप रु. १४८ कोटी ९८ लाख असून बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये ७९ कोटी ९६ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये २२१७ कोटींची झालेली आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश बो-हुडे सर यांनी सांगितले की संस्थेने २२ वर्षाच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली असून सभासदांना घर बांधणी, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदी तसेच गोरगरीब गरजू घटक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगार यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
संस्थेने २२ वर्षाच्या कालावधीत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे (नवी मुंबई), खडकवाडी, आळेफाटा, सुपा व शिरूर येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्यावत इमारती आहेत. पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा ता. जुन्नर, सुपा, कामोठे (नवी मुंबई), वनकुटे, अहिल्यानगर, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा आहे.
संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी व जामगाव, ढवळपुरी व बेलवंडी फाटा येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संस्थेच्या अद्यावत कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, चेक क्लिअरींग सुविधा, एसएमएस सुविधांमुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काल मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, आरटीजीएस व एनईएफटी सुविधा सुरू करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.