पारनेर । नगर सहयाद्री:-
अवैध मुरूम उत्खनन, अवैध दारूविक्री यांसखेरीज चोऱ्या रोखून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात निघोज पोलिसांसह पारनेर पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून कारवाईबाबत अपयश की डोळेझाक? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा झडत आहे.
पारनेर तालुक्यातील पश्चिम भागातील पिंपरी जलसेन, चिंचोली, गांजीभोयरे, सांगवी सुर्या गावांसह परिसरातील गावांत राजरोसपणे हॉटेल व्यावसायिकांसह इतर ठिकाणी अवैध दारूविक्री, मटका, जुगार सर्रास सुरू आहे. याच परिसरांत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून बिना क्रमांकाच्या वाहनातून दिवसाढवळ्या मुरूम उत्खनन होत आहे.
याशिवाय याच परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांकडून भर दिवसा ऐवज लुटून नेला जात आहे. नुकतेच पिंपरी जलसेन येथील लोकवस्तीत असणाऱ्या एका मंदिरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केली. यापूर्वी देखील अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. एकंदरीत सर्व बाबीचा विचार करता गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिलेले दिसत नाही.
गुन्हेगार गुन्हे करून एक प्रकारे पोलिसांना आव्हान देत आहेत. परंतु हे सर्व अवैध प्रकार रोखण्यात निघोज दुरक्षेत्र व पारनेर पोलिस स्थानक यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून योग्य कारवाई करून गुन्हेगारांवर वचक ठेवणे गरजेचे असून पोलिसांनी ॲक्शन मोडवर काम करणे गरजेचे आहे.
भुरट्या चोरांकडून मंदिरांना लक्ष
भुरट्या चोरांकडून मंदिरांना लक्ष केले जात असून मंदिरातील दानपेटी, मंदिरातील पितळी घंटी आदी मौल्यवान वस्तू चोरटे चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे. भरवस्तीतून केलेल्या चोरीबाबत चोरट्यांच्या धाडसाबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.