१० ऑगस्टला मतदान । ८१ सभासद ठरवणार भवितव्य
पारनेर | नगर सहयाद्री
पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये थेट सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. येत्या १० ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीस राजकीय चुरस निर्माण झाल्यामुळे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी ८१ दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार असून, संघाचे पुढील नेतृत्व हेच ठरवणार आहेत. सुरुवातीला ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या शेवटी १३ अर्ज मागे घेण्यात आले आणि आता १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आजी-माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये होत असल्याने तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खासदार नीलेश लंके गटाच्या विरुद्ध माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे समर्थक विद्यमान आमदार काशिनाथ दाते, भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या गटात लढत रंगणार आहे. पारनेर तालुका दूध संघ मागील १० वर्षांपासून बंद होता. मागील चार वर्षांपासून तो पुन्हा सुरू झाला असून, सध्या दररोज सुमारे सहा हजार लिटर दूध संकलन होत आहे.
पूर्वीच्या काळात या संघाचे दैनंदिन संकलन ७० हजार लिटरपर्यंत होते. दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी संचालकांच्या हाती संघाचा कारभार आल्यास, संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना आहे. ही निवडणूक दूध संघाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.