पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोडेबाजाराचे आरोप-प्रत्यारोप सुरू असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट राजकीय संघर्ष उफाळला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले. अडसूळ यांनीच महायुतीच्या भाजप नगरसेवक अशोक चेडे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचा दावा महायुतीने केला.
याला प्रत्युत्तर देताना नितीन अडसूळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, खासदार नीलेश लंके यांच्यामुळे मी पारनेर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष झालो. महाविकास आघाडीबरोबर मी प्रामाणिक राहिलो आहे. चेडे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून, ते माझे राजकीय विरोधक आहेत. त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
अडसूळ यांनी चेडे यांच्यावर पलटवार करताना म्हटले की, कधी पक्षश्रेष्ठींच्या नावाने, तर कधी माझ्या नावावर आपले अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चेडे करत आहेत. या निवडीमुळे पारनेरच्या राजकारणात तणाव वाढला असून, दोन्ही गटांमध्ये शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीचा निकाल येत्या काळात राजकीय समीकरणे कशी बदलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



