बीड / नगर सह्यादी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव आहे. मागील विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानपरिषद व राज्यसभा निवडणुकांच्यावेळीही त्यांचे नाव चर्चत आले होते. आता त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. “लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. पण तरीदेखील भाजपकडून अद्याप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
“लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं. “मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.