spot_img
अहमदनगरपगारी कर्मचार्‍यांच्या उर्मटपणाने गावागावात दहशत

पगारी कर्मचार्‍यांच्या उर्मटपणाने गावागावात दहशत

spot_img

मतदारसंघ ही कार्पोरेट कंपनी नसल्याचे सांगण्यास सरसावले कर्जत- जामखेडकर! कुटुंब अन् कर्मचार्‍यांपलिकडे गावागावातील पदाधिकार्‍यांचा केला कचरा! / मानसन्मान हा शब्दच रोहीत पवारांच्या डिक्शनरीत सापडेना | अपमान अन् दुय्यम वागणूक मिळाली नाही असे गाव नाही अन् कार्यकर्ताही तर नाहीच नाही!

सारिपाट / शिवाजी शिर्के

पाच वषापूर्वी राम शिंदे यांच्या काही चुका झाल्या. त्यातून कर्जत- जामखेड तालुक्यातील गावागावातील पुढारी मंडळी नाराज झाली आणि त्यांना पर्याय मिळाला तो रोहीत पवार यांचा! पवारांचा नातू म्हणून ज्या रोहीत पवारांच बारसं पाच वर्षापूर्वी सार्‍यांनी मिळून घातलं तेच बारसं घातलेलं बाळ उर्मट अन् सत्ता, पैशाची मस्ती असणारं निघालं! कार्पोरेट कंपनी चालविल्यागत काम करणारा आपण एमडी निवडला की काय असा प्रश्नच गेल्या पाच वर्षात दोन्ही तालुक्यातील जनतेला पडला. गावागावात समर्थक कार्यकर्त्यांऐवजी बारामती अ‍ॅग्रोच्या कर्मचार्‍यांचें विणलेले जाळे, त्यांच्याकडून स्थानिक गावकर्‍यांना मिळालेली उर्मट वागणूक, त्यांचीच दहशत हे एका बाजुला आणि त्याच्या दुसर्‍या बाजूला सापडेल तिथे प्रत्येक पदाधिकारी, ग्रामस्थांचा रोहीत पवार यांच्याकडून केला जाणारा पानउतारा! स्वत:चे आई- वडिल सोडले तर रोहीत पवार यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य देखील फाट्यावर मारले अशी भावना आता या मतदारसंघातून व्यक्त होताना दिसत आहे. ग्रामपंचायत शिपायाला मानसन्मान देणारे ८५ वर्षे वयाचे शरद पवार एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला गावागावातील सरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आजी- माजी पदाधिकार्‍यांची अक्कल काढत त्यांचा चारचौघात पानउतारा करणारा त्याच पवारांचा नातू! या मतदारसंघात रोहीत पवार यांचे पार्सल बारामतीला पाठविण्याचा निर्धार व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.

राम शिंदे हे पालकमंत्री असताना त्यांच्याकडून मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले. जोडीने या दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे शिंदे यांचे दुर्लक्ष झाले. राज्यात थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात दाखल झाल्याने राम शिंदे यांच्याकडून मतदारसंघातील कार्यकत्यार्ंंना न्याय देताना काही चुकाही झाल्या. त्या आधीच्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या विरोधात चारंगी लढत झाली. चार उमेदवार समोर आले आणि त्यातून मतविभागणी झाली. त्यात राम शिंदे यांची लॉटरी लागली. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या विरोधात पवारांच्या कुुटुंबातील उमेदवार असावा अशी भूमिका पवार समर्थकांनी मांडली. त्यातून रोहीत पवार यांचे नाव पुढे आले. रोहीत पवार यांच्या माध्यमातून राम शिंदे यांचा काटा काढण्यात शिंदे विरोधक यशस्वी झाले खरे! मात्र, त्यानंतर आमदारकी आणि लागलीच सत्तेची हवा रोहीत पवार यांच्या डोक्यात गेली. पवारांचा नातू म्हणून राज्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासनात वेगळे वलय निर्माण झाले. त्यातच मिडियाची हवा त्यांच्या डोक्यात गेली.

मविआची सत्ता असताना पहिल्या अडीच वर्षात रोहीत पवार हे मुंबई- पुण्यातून मतदारसंघ चालवत राहिले. (त्यांची हजेरी लागली असेल तर ती व्हर्च्युअल!) राज्यातील भाजपासह विरोधी पक्षातील नेत्यांवर बरसताना ट्वीटर (एक्स), फेसबुक, व्हाटसअप सारख्या समाजमाध्यमातून चमकत राहिलेल्या रोहीत पवार यांनी कर्जत- जामखेड या दोन्ही तालुक्यातील गावागावांमध्ये खासगी कर्मचारी नियुक्त केले. ज्यांचे काम असेल त्यांनी या कर्मचार्‍यांना भेटायचे! गावातील आजी- माजी सरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद- पंचायत समितीचे आजी- माजी सदस्य, पदाधिकारी अशा सार्‍यांना या यंत्रणेने फाट्यावर मारले. मतदारसंघातील कोणत्याही कामाचे भूमिपुजन अथवा उद्घाटन करायचे असेल तर ते स्वत: येणार! त्यांना शक्य नसेल तर त्यांचे वडिल किंवा आई हजेरी लावणार! कोणत्याही पदाधिकारी, सरपंचाचे नाव कोणत्याच कोणशिलेवर दिसले नाही.

मतदारसंघ ही कार्पोरेट कंपनी आणि त्या कंपनीचा मी एमडी! मी घेईल तो निर्णय अंतिम आणि त्या निर्णयाच्या विरोधात बोलेल त्याला शिव्या, असाच कारभार रोहीत पवार यांनी गेल्या पाच वर्षात केल्याचा आरोप आता गावागावातून होत आहे. सार्‍यांनाच दुय्यम दर्जाची आणि अपमानास्पद वागणूक देणार्‍या या रोहीत पवार यांना आता थेट कायमचेच बारामतीला पाठवून मागची चूक दुरुस्त करण्यास येथील मतदारांसह पदाधिकारीही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
कर्जत व जामखेड अशा दोन तालुयांचा हा एकत्रित मतदारसंघ. दोन्ही तालुयांची राजकीय, भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मतदारसंघ तसा दुष्काळी. काही भागांत कुकडी कालव्याने सुबत्ता निर्माण केली. दोन्ही बाजूंनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र अनेक योजना अपूर्णावस्थेत आहेत. अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांचेही तालुयात प्रभावक्षेत्र आहे. त्याचा राम शिंदे कसा उपयोग करून घेतात, यावरही निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. रोजगाराच्या फार संधी उपलब्ध नसल्याने मतदारसंघात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. औद्याोगिकीकरणाअभावी तरुण बाहेर जात आहेत. असे असतानाही मतदारसंघात एमआयडीसी कुठे स्थापन करायची, याचा वाद रोहित पवार व राम शिंदे या दोघा आमदारांत रंगला होता. मतदारसंघात जातीय समीकरणेही प्रभावी आहेत. मराठा, माळी, धनगर समाजांचे मतदान लक्षणीय आहे. त्याखालोखाल मुस्लीम व मागासवर्गीयांचे मतदान आहे. ही मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होताना दिसतात. मात्र, सार्‍यात प्रभावी मुद्दा ठरलाय तो रोहीत पवार यांनी प्रत्येकाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा! बदल्याची ही भावना अधिक तीव्र असल्याचे दिसून येत असून त्यात रोहीत पवार यांचे पार्सल थेट बारामतीला माघारी पाठवले जाणार अशीच चिन्हे आजतरी दिसून येत आहेत.

पहिल्या रांगेत अधिकारी अन् पदाधिकारी दुसर्‍या रांगेत, हा कुठला न्याय?
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या पत्रिकेवर कोणत्याच पदाधिकारी, कार्यकर्त्याचे नाव छापून त्यांना मोठेपणा देण्याचे काम रोहीत पवार यांनी केले नाही. मी आणि मीच, या भावनेतू त्यांनी स्वत:वर लक्षकेंद्रीत करणारे काम केले. कोणत्याही कार्यकर्त्याने, पदाधिकार्‍याने किरकोळ कामासाठी तहसील, पोलिस ठाण्यात फोन केला तरी त्याचे काम कधीच झाले नाही. उलटपक्षी बारामती अ‍ॅग्रोच्या कर्मचार्‍याने फोन केला तर तेच काम तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याकडून दुसर्‍या सेकेंदाला झाले. आता मतदान आले म्हणून आम्हाला मोठेपणा दिला जात असेल तर त्याआधी आमचा झालेला अपमान, झालेला पानउतारा त्याचे काय असा थेट सवाल गावागावातून उपस्थित केला जात आहे. कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीत स्थानिक पदाधिकार्‍यांना न बसवता रोहीत पवार यांनी त्यांच्या उजव्या- डाव्या बाजूला तहसीलदार, पोलिस अधिकारी, बीडीओ, वीज मंडळाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांना स्थान दिल्याचा आरोपही आता जाहीरपणे होऊ लागला आहे.

प्रवीण घुले, राजेंद्र गुंड, राळेभात, तापकीर,
शेवाळे यांच्यासह अनेकांचा हजारदा अपमान!
मागील म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या विरोधात थेट भूमिका घेत रोहीत पवार यांच्या विजयासाठी रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून रोहीत पवार यांना विजयी करण्यासाठी माजी सभापती प्रवीण घुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड, प्रा. मधुकर राळेभात, काकासाहेब तापकीर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास शेवाळे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. याशिवाय ज्येष्ठ नेते अंबादास पिसाळ यांनी पडद्याआड राहून पवारांना मदत केली. या सार्‍यांना निवडून आल्यानंतर रोहीत पवार यांनी खड्यासारखे बाजूला केले. यातील एकालाही गेल्या पाच वर्षात रोहीत पवार यांनी ना मान दिला, ना सन्मान! उलटपक्षी संधी मिळेल त्यावेळी या स्थानिक नेत्यांच्या विरोधात गावागावात दुसरी फळी उभी करण्याचे आणि त्या माध्यमातून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम रोहीत पवार यांनी केल्याची चर्चा मतदारसंघात झडत आहे. आता यावेळी ही सारी नेतेमंडळी पदरमोड करत राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. रोहीत पवार यांनी दुखावला नाही असा पदाधिकारी सापडून दाखवा अन् बक्षिस मिळवा अशी टॅगलाईनच सध्या या मतदारसंघात सोशल मिडियात दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं...

विजयाची फुले पवारांना अर्पण करणार ः प्रणोती जगताप

राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी श्रीगोंदा | नगर सह्याद्री महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी पारनेर | नगर सह्याद्री - राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा...

सेटलमेंट झाली की ते माघार घेतील अन् एकाला पाठींबा देतील!; विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत

श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत...