निघोज । नगर सहयाद्री
आषाढी एकादशीचे औचित्य साधून महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन व दर्शन घडावे यासाठी निघोज परिसरातील शाळांनी पायी दिंडीचे आयोजन केले होते. पंढरपूर वारीचा भव्य आणि भक्तिपूर्ण अनुभव विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीमधून साकार झाला. विविध शाळांतील बाल वारकऱ्यांनी प्रदक्षिणा घालीत विठ्ठलनामाचा गजर करत गावात पंढरीचं दर्शन घडवलं.
मुलिका देवी विद्यालय, मळगंगा विद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा, अंगणवाडी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल आणि अन्य खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, लेझीम आणि फुगडीच्या गजरात निघोजला भक्तीमय रंग चढवला. मुलिका देवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत चौकात सुरेल भजने सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. अंगणवाडी व जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील भजने, नृत्य आणि पारंपरिक खेळांमधून भक्तीचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमानिमित्ताने संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व पत्रकार संघ निघोज यांच्या संयुक्त विद्यमाने मुलिका देवी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश अवघडे यांचा ज्ञानेश्वर वरखडे (उपसरपंच), भास्करराव वराळ (माजी सदस्य) आणि पांडुरंग वराळ पाटील (ज्येष्ठ मार्गदर्शक) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी मुलिका देवी विद्यालयाच्या पालखीचे दर्शन घेऊन पूजा केली.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, सरपंच चित्राताई वराळ पाटील,पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, राजमुद्रा कंट्रक्शन कंपनीचे संचालक बाबाजी लंके, राहुल वराळ, अक्षय वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ठकाराम गायखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.