राहाता, जामखेड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार (दि. 7) रोजी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडत आहे. या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारणसाठी 3, सर्वसाधारण महिलांसाठी 3, ओबीसीसाठी 2 आणि ओबीसी महिलेसाठी 2, तसेच अनुसूचित जाती व जमाती (महिलेसह) 3 पदे हे सभापतीपदाचे आरक्षण हे चिठ्ठ्याव्दारे काढण्यात आले आहे.
अशातच आता यामध्ये राहता आणि जामखेड पंचायत समितीचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. तर नेवासा आणि कर्जत हे ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित झाले आहे. तसेच नगर, पारनेर आणि श्रीगोंदा हे खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. याशिवाय पाथड अनुसूचित जाती महिला, संगमनेर अनुसूचित जाती, अकोले अनुसूचित जमाती, कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण, शेवगाव आणि राहुरी हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद गट व गणाच्या आरक्षण सोडतीसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून तो 8 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे गट जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार यांनी काढणे, 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
पारनेरमध्ये महिलाराज
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाल्याने आता या तालुक्यात महिलाराज येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या आरक्षणामुळे पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदावर महिला नेतृत्वाची निवड होणार असून, इच्छुक महिला उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील राजकीय वर्तुळात सभापतीपद कोणत्या महिलेला मिळणार, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक इच्छुकांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून पक्षीय पातळीवरही रणनीती आखली जात आहे. पारनेर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत. जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील आरक्षण दि. 13 व 14 रोजी जाहीर होणार आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. निघोज मधून चित्रा वराळ, टाकळी ढोकेश्वर मधून सुप्रिया झावरे, सुप्यामधून राणीताई लंके, प्रियांका शिंदे, सुवर्णा घाडगे, सुषमा रावडे, ढवळपुरी भाळवणी मधून सुमन तांबे, लिलाबाई रोहोकले, कान्हूर पठार मधून सुशीला ठुबे जवळ्या मधून सोनाली सालके ही नावे चर्चेत आहेत.