नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये (पावसाळी अधिवशन) प्रदीर्घ चर्चा चालू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२९ जुलै) या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी अमित शाह म्हणाले, “भारताचे पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्व आहे. १९४८ च्या भारत-पाक युद्धावेळी नेहरुंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला नसता तर आज वेगळी परिस्थिती असती.”
अमित शाह म्हणाले, “विरोधक सातत्याने आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आपण सुस्थितीत होतो, तर पाकिस्तानबरोबर युद्ध का केलं नाही? मला त्यांना सांगायचं आहे की युद्धाचे अनेक परिणाम होतात. खूप विचार करून असे निर्णय घ्यावे लागतात.”
…तेव्हा आपण काश्मीरमध्ये घुसू शकलो असतो : शाह
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “युद्ध का केलं नाही विचारणाऱ्यांना मी या देशाच्या इतिहासातील काही उदाहरणं देऊ इच्छितो. १९४८ साली भारत – पाकिस्तान युद्ध झालं. त्या युद्धात आपल्या लष्कराने आघाडी घेतली होती. आपलं लष्कर काश्मीरमध्ये अशा स्थितीत होतं जिथून आपण पाकिस्तानमध्ये घुसू शकलो असतो. परंतु, आपले तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युद्धविराम जाहीर केला. आपले तत्कालीन गृहमंत्री दिवंगत वल्लभभाई पटेल नेहरूंना थांबवत होते. परंतु, नेहरूंनी पटेलांचं ऐकलं नाही. नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर करून टाकला. “
अमित शाह म्हणाले, “मी खूप जबाबादारीने बोलतोय. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे सांगतोय की पाकव्याप्त काश्मीरचं आज जे अस्तित्व आहे ते केवळ नेहरुंच्या युद्धविरामामुळेच आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या स्थितीला नेहरूच जबाबदार आहेत. १९६० मध्ये देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा देखील वल्लभभाई पटेल हे घोषणा करण्यासाठी कार घेऊन आकाशवाणीच्या केंद्रावर गेले होते. मात्र, आकाशवाणीचा दरवाजा बंद करण्यात आला. १९६० मध्ये आपण पाकिस्तानबरोबर सिंधू जलकरार केला आणि सिंधू नदीचं आपल्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिलं. सिंधू नदीच्या पाण्याच्या विषयावर, भौगोलिक रणनितीच्या बाबतीत आपण मजबूत स्थितीत होतो, तरीदेखील आपण सिंधू जलकरार केला आणि सिंधू नदीचं ८० टक्के पाणी पाकिस्तानला देऊन टाकलं.”
ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे काय म्हणाल्या पहा
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये प्रदीर्घ चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ आहे. प्रणिती शिंदे सभागृहात म्हणाल्या की “ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी देशभक्तीचं वाटत असलं तरी हा केवळ सरकारचा प्रसारमाध्यमांवरील तमाशा होता. या मोहिमेतून सरकारने काय सिद्ध केलं ते अद्याप कोणालाही समजलेलं नाही.”
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना असं वाटतं की यात देशभक्ती आहे. मात्र, हा प्रसारमाध्यमांवर दाखवला गेलेला सरकारचा एक तमाशा होता. कारण या मोहिमेद्वारे आपण काय साध्य केलं, किती दहशतवाद्यांना पकडलं, शत्रूने आपली किती विमानं पाडली या हल्ल्याला कोण जबाबदारी होतं, यात कोणाची चूक होती, दहशतवादी कुठून आले, आपल्या नागरिकांना ठार मारून दहशतवादी कुठे पळून गेले, यापैकी सरकारला काहीच माहिती नाही. सरकारकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही.”
“पंतप्रधान २४/७ निवडणुकांच्या विचारात असतात”
काँग्रेसच्या खासदार म्हणाल्या, “सरकारकडे ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आणि यांना शेजारी असलेल्या देशावर आक्रमण करायचंय, त्या नावाखाली निवडणुकीत लोकांची मतं घ्यायची आहेत. कोणी मेलं तरी यांना काहीच फरक पडत नही. कारण आपले पंतप्रधान आणि सरकार २४/७ (दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस) निवडणुकांच्या मोडमध्ये असतात. आपल्या देशाची प्रतिमा याआधी इतकी कमकुवत कधीच झाली नव्हती. मात्र, या लोकांमुळे तसं घडलंय. कारण यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे. माझी मोदींना विनंती आहे की प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणं थांबवा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची ‘मन की बात’ थांबवून ‘जन की बात’ करावी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत दाखवावी.”
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. ऑपरेशन महादेवअंतर्गत भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरवर कालपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, कालच्या कारवाईत सुलेमान, अफगान आणि जिब्रान या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांना अन्न पुरवणाऱ्या लोकांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं. या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणल्यानंतर, ताब्यात घेतलेल्या लोकांनी हे दशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती दिली.
सभागृहात चर्चा करताना अमित शहा म्हणाले, सुलेमान उर्फ फैसल आणि अफगान हे लष्कर – ए- तैयबाचे एका श्रेणीचे कमांडर होते. याशिवाय जिब्रान देखील दहशतवादी होता. बैसरन खौऱ्यात निष्पाप लोकांना ठार करण्यात आलं. त्या तिन्ही दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे, असं शहा म्हणाले.
‘तीन दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरमध्ये दाखल होताच सर्वांनी त्यांची ओळख पटवली. तसेच दहशतवादी हल्ल्याचा एफएसएल अहवाल देखील तयार केला होता. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, त्यांच्या रायफलमधील गोळे एफएसएल अहवालाशी जुळत होते. चंदीगढमध्ये झालेल्या तपासानंतर हे सिद्ध झाले आहे’, असंही अमित शहा म्हणाले.
नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले
‘पहलगाम हल्ल्यानंतर मी त्याच दिवशी श्रीनगरला गेलो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २३-२४ एप्रिल रोजी सीसीएस बैठक घेतली होती. यात सिंधू नदीचा करार पुढे ढकलण्यात आला होता. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही योग्य उत्तर दिले जाईल, असं ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, ३० एप्रिल रोजी मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर पार पडलं. यात ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आलं’, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“सत्ताधाऱ्यांनी केलेल्या सगळ्या भाषणांतून सुटलेली गोष्ट म्हणजे पहलगाम हल्ला का आणि कसा झाला”, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत पहलगाम हल्ला व त्यापाठोपाठ राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावर सविस्तर चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, पर्यटक पहलगामला सरकारच्या भरवश्यावर गेले होते, पण सरकारनं त्यांना देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं, असंही त्या म्हणाल्या.
“कालपासून मी सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकते आहे. संरक्षण मंत्र्यांनी तासाभराचं भाषण केलं. पण त्या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट सुटली. २२ एप्रिल रोजी जेव्हा २६ भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर जीवे मारलं गेलं, तो हल्ला कसा झाला? का झाला? हे दहशतवादी तिथे कसे आले? आजकाल प्रचाराचं युग आहे. आपलं सरकार गेल्या काही काळापासून जाहिरातबाजी करत आहे की काश्मीरमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं आहे. पण त्याचदरम्यान पहलगाममध्ये हल्ला झाला”, असं प्रियांका गांधी आपल्या भाषणाच्या सुरुवातील म्हणाल्या.
तिथे एकही सैनिक सुरक्षेसाठी नव्हता – प्रियांका गांधी
दरम्यान, पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तिथे एकही सैनिक किंवा पोलीस नव्हता, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. यासाठी त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ दिला. “एक तास हे दहशतवादी तिथे बेफामपणे सगळ्यांना मारत होते. यादरम्यान तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देशाने, सरकारने आम्हाला तिथे अनाथ सोडून दिलं होतं”, ही द्विवेदींच्या पत्नीची प्रतिक्रिया प्रियांका गांधींनी वाचून दाखवली.
“सरकारला तिथल्या परिस्थितीबाबत माहिती नव्हतं? हे लोक तिथे सरकारच्या भरवश्यावर गेले, आणि सरकारनं त्यांना तिथे देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पंतप्रधान, गृहमंत्र्यांची, संरक्षण मंत्र्यांची नव्हती का?” असा जाबही प्रियांका गांधींनी सरकारला विचारला आहे.
पहलगाम हल्ल्याच्या दोन आठवडे आधी गृहमंत्र्यांचा दौरा
दरम्यान, यावेळी बोलताना प्रियांका गांधींनी हल्ल्याच्या दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या पहलगाम दौऱ्याचाही दाखला दिला. “पहलगामच्या फक्त दोन आठवडे आधी गृहमंत्री तिथे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. ते तिथे म्हणाले होते की आता दहशतवादावर विजय मिळाला आहे. हल्ल्याच्या तीन आठवड्यांनंतर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल एका ठिकाणी सहज म्हणाले की तिथे घडलेल्या गोष्टींमध्ये खूप दुर्लक्ष झालं होतं आणि त्याची जबाबदारी मी घेतो. पण ते तिथेच संपून जातं. त्यांना कुणी काही विचारत नाही, ते कुणाला काही उत्तरही देत नाही”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. “त्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं घेतली. २०१९ साली हा गट तयार झाला. २०२० मध्ये त्यानं काश्मीरमध्ये कारवाया सुरु केल्या. एप्रिल २०२० ते २२ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांनी भारतात २५ दहशतवादी हल्ले केले. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात यूपीए सरकारच्या काळातील दहशतवादी हल्ल्यांची संख्या २५ सांगितली. पण या गटानं २०२० ते २०२५ पर्यंत २५ हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये टीआरएफने ४१ सुरक्षा कर्मचारी, २७ नागरिकांची हत्या केली. ५४ लोकांना जखमी केलं. पण भारत सरकारने टीआरएफला २०२३ मध्ये दहशतवादी संघटना ठरवलं. तीन वर्षं ते मोकाटपणे दहशतवादी कारवाया करत होते”, अशा शब्दांत प्रियांका गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.