अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
बुधवारी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत राज्यातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे. नोटाला मतदान करणे किंवा मतदानासाठी बाहेर न पडणे या गोष्टींविषयी पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
लोकसभा, विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरात समाज आणि राष्ट्रहिताचे निर्णय होतात. त्यातून आपल्या समाजाला दिशा मिळते. दिवसेंदिवस नोटाला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच मतदानाला न येण्याचेही प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. आपल्या एका मताने मोठे आपल्या राष्ट्राचे, राज्याचे मोठे नुकसान होत असल्याचे पवार यांनी नमुद केले आहे.
भ्रष्टाचार, बेकारी, शेतमालास न मिळणारे भाव, वाढती व्यसनाधीनता व राजकारणातील लोप पावत चाललेला आदर्शवाद यामुळे नाराज होऊन अनेक जण मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. आपल्या देशाची लोकशाही जगाला सामावून घेणारी आदर्श लोकशाही आहे. कोणत्याही कारणामुळे नाराज असाल तरी सामान्य माणूस पाहून जिथे शक्य तिथे मत दिले पाहिजे. मतदानाचे घटते प्रमाण हे लोकशाहीला घातक आहे. मतदानाचा टक्का वाढला तर जो निवडणूकीचा हेतू आहे तो साध्य होईल. मतदानाचा टक्का वाढला तर मतदान घडवून आणण्यासाठी राज्यकर्त्यांना जी धडपड करावी लागते ती करावी लागणार नाही. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे. ही लोकशाही त्यातून अधिक बळकट होण्यास मदत होईल असे पवार यांनी या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
नितीमुल्ये व राष्ट्रप्रेमाची बैठक निर्माण होण्याची गरज असून हिवरे बाजारमध्ये कोणत्याही उमेदवाराची मदत न घेता स्वयंप्रेरणेने मतदान केले जाते. हिवरे बाजारचे सर्वांनी अनुकरण करावे. जगापुढे तापमान वाढीचे मोठे संकट आहे. कारण तापमानबदलाचे दुरगामी परिणाम हेहे कृषी व ग्रामविकासावर होत आहेत त्यातून मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.अशा प्रसंगी लोकशाहीचे मंदिरे बळकट होण्याची गरज आहे.तरच राष्ट्र व समाजहिताचे निर्णय व त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकते गेली 30 वर्षे हिवरे बाजारमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहोत.निवडणूकीच्या माध्यमातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी घ्यावयाच्या निर्णयांचे माध्यम होऊ शकतात. महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात राबविण्यात आलेली धोरणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. त्यासाठी मतदान होणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.