spot_img
अहमदनगरसंतापजनक: गटशिक्षणाधिकार्‍यानेच ठेवला मास्तरणीवर डोळा!

संतापजनक: गटशिक्षणाधिकार्‍यानेच ठेवला मास्तरणीवर डोळा!

spot_img

देवेंद्रजी; माता भगिनींचे काय घेऊन बसलात, शाळेत मुला-मुलींना शिकवणार्‍या ‘बाई’च नगरमध्ये असुरक्षीत

सारिपाट| शिवाजी शिर्के :-

वासनांध, विकृत अधिकार्‍याला कोण घालतेय पाठीशी? आशिष येरेकरजी, धनवे तुमचा जावई आहे काय? | समितीने दोषी ठरवूनही झेडपी सीईओ अन् बीडीओने का घातले पाठीशी?

कोलकत्याची घटना घडली. लागोपाठ बदलापूरची घटना घडली. यातून उभ्या देशात संतापाची लाट उसळली असताना या दोन्ही घटनांच्या काही महिने आधी मुलींना शिक्षण देणार्‍या महिला शिक्षिकेशी वर्गातील विद्यार्थ्यांसमक्ष लगट करण्यासह तिच्याबाबत अश्लिल बोलण्याचा ‘प्रताप’ जामखेडच्या धनवे या गट शिक्षणाधिकार्‍यांनी केला. ज्या क्षणी एखादी स्त्री हवीशी होते, त्या क्षणी ती उपलब्ध असणे, नसेल तर काहीही करून ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिला जन्माचा धडा शिकवणे अशा विकृत आणि किळसवाण्या मानसिकतेतील बाळासाहेब धनवे या गट शिक्षणाधिकार्‍याला चौकशी समितीने दोषी ठरवले असतानाही त्याच्या विरोधात ना गटविकास अधिकार्‍याने कारवाई केली ना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी! या दोघांचाही बाळासाहेब धनवे हा जावई झाला आहे काय? महिला शिक्षिकेने या धनवेला जोरदार प्रत्युत्तर करत त्याच्याबद्दल तक्रार करताच वासनांध झालेल्या या धनवे याने क्रौर्याचे टोक गाठले आणि संबंधित शिक्षिकेसह तिचा शिक्षक असणारा पती आणि भाऊ या दोघांच्याही विरोधात कारवाई केली. हे सारं घडत असताना झेडपी सीईओ असणार्‍या आशिष येरेकर यांच्यासह गटविकास अधिकारी अशी सारीच मंडळी या धनवेच्या पाठीशी उभी राहिल्याने आता या सार्‍यांच्याच विकृतीचा पर्दाफाश झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!

‘असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस!’, या मथळ्याखाली शनिवारच्या (दि.२४) अंकात ‘सारिपाट’ प्रकाशित होताच! त्याचे सर्वत्र सामुहिक वाचन झाले. राज्य सरकारच्या विरोधातील तीव्र भावनाही अनेक ठिकाणी व्यक्त झाल्या. पुरागामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षीत आहेत की नाही याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिक्षण, घरातील वातावरण, स्त्रीवादी विचार, संबंधित व्यक्तीची संवेदनशीलता या सगळ्याच्या परिणामी काही थोडके पुरुष या सगळ्यापासून वाचून अपवाद ठरतात खरे, पण बाकी अनेक जण हिंमत नसते म्हणून किंवा संधी मिळत नाही म्हणून साळसूद वावरत राहतात. रस्त्यावर छेड काढणे, अश्लील बोलणे, अश्लील लिप्स पाठवणे, अंगचटीला जाणे असे ‘पुरुषार्थ’ या सगळ्यातूनच येतात. नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी या पदावर काम करणारा बाळासाहेब धनवे हा त्यातीलच एक!

ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षकांकडून हे काम योग्य पद्धतीने होते किंवा नाही यासाठी तालुक्याचा प्रमुख म्हणून या पदावर अधिकारी नियुक्त केले जातात. तशीच नियुक्ती बाळासाहेब धनवे याची केली गेली. जामखेड येथे नियुक्ती मिळण्याच्या आधीही ते महिलांना त्रास देणारे, छळणारे अशीच ख्याती घेऊन जामखेडला आले. काही दिवसातच त्यांनी आपल्या लिला सुरू केल्या! जामखेड तालुक्यातील एका गावातील शाळेला भेट दिल्यानंतर त्या शाळेतील एका वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे शालेय ज्ञान तपासण्याचा निर्णय घेतला. हे सारे करत असताना संबंधित वर्गातील शिक्षिकेच्या बाजूलाच लगट करून ते उभे राहिले. मुलांना कविता म्हणण्यास सांगितली. त्याचवेळी जोडशब्दाचे ज्ञान तपासण्याचा निर्णय घेत त्यांनी मुलांना फळ्यावर जोडशब्द दिला. हा जोडशब्द चक्क त्या शिक्षिकेच्या नावाचाच दिला! तो देखील एकेरी! यानंतर ते खुर्चीत बसले. संबंधित महिला शिक्षिकेला देखील त्यांनी खुर्चीत शेजारीच बसण्यास सांगितले. शिक्षिकेने त्यास नम्रपणे नकार दिला.

यानंतर या महाशयांनी पुढचे पाऊल उचलत त्या शिक्षिकेच्या केसात हात घातला. डोळ्यावरील गॉगल खाली- वर करत ते तिच्याकडे पाहू लागले. यानंतर ते पुन्हा त्या मॅडम शेजारी उभे राहिले. मॅडम बाजूला होताच हे महाशय पुन्हा त्या मॅडमच्या शेजारी लगट करत उभे राहू लागले. यानंतर महिला शिक्षिकेने वर्गातून बाहेर पळ काढला. यानंतर हे साहेबही बाहेर आले. कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर कारवाई करील अशी दमदाटी त्यांनी केली आणि ते निघून गेले.
सदरबाबत संबंधित महिला शिक्षिकेने थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. यानंतर चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आणि संबंधित महिला शिक्षिका व गट शिक्षणाधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले. जबाब नोंदवताना झालेल्या संबंधित मॅॅडमने सविस्तर घटनाक्रम सांगितला आणि साहेबांनी काळ्या रंगाचा गॉगल घातला होता असा जबाब नोंदविला.

यानंतर घटनेचा इन्कार करताना हे बाळासाहेब म्हणाले, ‘मी त्या घटनेच्या दिवशी काळा गॉगल नव्हे तर ब्राऊन रंगाचा गॉगल घातला होता’. गॉगल काळा होता की ब्राऊन रंगाचा यात बाळासाहेब अडकले आणि त्यांना वाटले आपण यातून सुटू! मात्र, सात जणांचा समावेश असणार्‍या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जे. आर. बेल्हेकर यांच्या समितीतील सातही सदस्यांनी याच बाळासाहेब धनवे यांना दोषी ठरवले आणि ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिग छळ प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण अधिनियम २०१३ नुसार लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये बाळासाहेब धनवे यांचे वर्तन येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस केली.

दि. २४ जुलै २०२४ रोजी समितीने हा अहवाल जामखेडच्या गट विकास अधिकार्‍यांकडे सादर केला. मात्र, त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. गट विकास अधिकार्‍याने धनवे याच्याकडून मलिदा घेतला की त्याच्याकडून अन्य काही हे आता बीडीओवर कारवाई झाल्यावरच समजेल. मात्र, त्याहीपेक्षा महिला कर्मचार्‍यावर त्यांच्या वरिष्ठांकडून असे वर्तन घडले आणि त्याचा अहवाल दोन महिन्यांपूर्वी आलेला असताना त्यावर झेडपी सीईओ या नात्याने आशीष येरेकर यांनी काहीच कारवाई का केली नाही हा खरा प्रश्न आहे.

कारवाई नाहीच, उलट धनवे झाले उपशिक्षणाधिकारी! देवेंद्रजी हे असले आहे का आपले पारदर्शी शासन?
धनवे हे नगरमध्ये येण्याआधी आष्टी (बीड) येथे गट शिक्षणाधिकारी होते. त्यावेळी ते लाचेच्या प्रकरणात सापडले. अँटी करप्शनची कारवाई झाली. मात्र, त्याने वरिष्ठांना हाताशी धरत पुन्हा त्याच आष्टीत पोस्टींग मिळवली. त्यानंतर त्यांची बदली नगरला झाली. मात्र, त्यांनी अत्यंत चतुराईने आष्टी शेजारीच असणार्या जामखेडमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून पोस्टींग मिळवली. शाळेतील महिला शिक्षिकेचे हे कथीत प्रकरण घडले आणि त्यांनी पुन्हा हातचलाखीने त्यांची बदली नगर जिल्हा परिषद मुख्यालयात माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली करून घेतली. नगर मुख्यालयात बसल्यानंतरही त्यांचे प्रताप काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. महिलांच्या सुरक्षेची बात करणार्या राज्य शासनात गृहमंत्री पदाची धुरा सांभाळणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शासन सेवेतील महिला असुरक्षीत असल्याचे या प्रकरणात स्पष्टपणे समोर आले असताना त्यांच्याच सरकारमधील अधिकारी धनवे सारख्या विकृती मानसिकतेतील अधिकार्याला पाठीशी घालत असल्याचे लपून राहिलेले नाही. धनवे याच्यावर कारवाई करण्याखचे सोडून त्याला मुख्यालयात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदलीच कशी मिळाली याची चौकशी आता दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच करावी आणि महिलांना त्रास देणार्या अधिकार्यांची हे शासन गय करत नसल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे.

येरेकर साहेब, तुमच्या बहिणीबाबत असे घडले असते तर…?
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष येरेकर हे सध्या कामकाज पाहत आहेत. दोनदा बदली आदेश निघाले. मात्र, सोयीची क्रीम पोस्टींग त्यांना मिळाली नाही आणि मग त्यातूनच त्यांनी ‘प्रयत्नपूर्वक’ नगरमध्येच आपली नियुक्ती कायम ठेवली, अशी चर्चा आहे. याबाबत विस्ताराने अनेक बाबींची चर्चा देखील होत आहे. मात्र, त्याच्या खोलात न जाता जामखेड तालुक्यातील ज्या महिला शिक्षिकेबाबत हा निंदणीय प्रकार घडला आणि त्या घटनेत चौकशी समितीने त्या अधिकार्‍याला दोषी ठरवून देखील त्याला पाठीशी काम केले जात आहे. सीईओ येरेकर हे कर्तव्यदक्ष असल्याचे मानले जाते. मग, असे असेल तर या धनवे नामक गटशिक्षणाधिकार्‍याकडून त्यांना ‘मलिदा’ भेटलाय का? तसे नसेल तर या अधिकार्‍यावर कारवाई का नाही? जामखेडच्या बीडीओने कारवाईबाबत काहीच प्रस्ताव पाठवला नसेल तर त्या बीडीओवर काय कारवाई झाली हेही समोर येण्याची गरज आहे. जर त्या बीडीओने अहवाल दिला असेल तर मग येरेकर यांच्याकडून विलंब का होत आहे याचीही चौकशी होण्याची गरज आहे. येरेकर साहेब, तुम्हाला बहिण आहे का? असेलच बहिण तर मग तिची अशा पद्धतीने भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर एखाद्याने छेड काढली असती तर आपण काय केले असते या एकाच प्रश्नाचे उत्तर जिल्ह्यातील महिला शिक्षिकांसह तमाम महिलांना हवे आहे!

जावयला सांभाळणार्‍या सासर्‍यावर (येरेकर) काय होणार कारवाई?
राज्यातील माता, भगिनी आणि मुली सुरक्षीत असल्याची टिमकी राज्य सरकार वाजवत आहे. जामखेडची ही घटना पाहता राज्य सरकार महिलांच्या प्रश्नावर किती उदासीन आहे आणि महिलांना न्याय न देता त्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा कसे लावत आहे हे प्रकरणातून समोर आले आहे. येरेकर यांनी हा धनवे जावई केला असेल तर येरेकर नामक सासर्‍यावर राज्य सरकार काय कारवाई करते हे पहावे लागणार आहे.

एक वासनेची शिकार होत असताना दुसरी सहकारी का राहिली शांत बसून?
वर्गात जाऊन मुलांसमोर हा धनवे त्या शिक्षिकेशी लगट करण्याचा आणि बाजूला चिटकून उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना बाईंनी त्यास विरोध केला आणि वर्गातून बाहेर पळ काढला. वर्गातून बाहेर येताच धनवे त्या बाईंवर ओरडला! त्यानंतर दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. दोघांमध्ये शाब्दीक वाद चालू असताना त्याच शाळेतील अन्य सहकारी महिला शिक्षिका तिच्या वर्गात बसून राहिली. धनवे याच्या चुकीच्या वासनांध वागणुकीबाबत एक महिला विरोध करत आवाज उठवत असताना दुसरी महिला शिक्षिका ‘आपण या गावचेच नाही’ असा तोरा मिरवत बसून राहिली. अशा महिलांमुळेच पुरुषी वासनांध विकृती बळावते आणि त्यातूनच मग कोलकत्ता, बदलापूरच्या घटनांपर्यंत मजल जाते. ती जात्यात जात असताना आपणही सुपात आहोत ही भावना त्या शिक्षिकेच्या मनात आली कशी नाही?

संतापजणक : विद्यार्थी म्हणाले, ‘मॅडम बाजूला सरकल्या की साहेबही मॅडमच्या बाजूला…!
शाळेतील वअर्गात विद्यार्थ्यांसमोर हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचे आपल्या तक्रारीत संबंधित महिला शिक्षिकेने म्हटले. त्यानुसार सात सदस्यांच्या गठीत करण्यात आलेल्या समितीने शाळेला अचानक भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. विद्यार्थ्यांचे हे जबाब अत्यंत धक्कादायक आहेत. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, ‘साहेब मॅडम शेजारी उभे राहिले. मॅडम बाजूला सरकले की साहेबही मॅडमच्या बाजूला सरकायचे’. दि. १५ जुलै २०२४ रोजी या अनुषंगाने वादग्रस्त अधिकारी धनवे याचा जबाब घेण्यात आला असता त्याने विद्यार्थ्यांनी दिलेल्या या जबाबाबाबत एक शब्दाचेही उत्तर दिले नाही. विद्यार्थ्यांसमोर चाळे करणारे या विकृत मनोवृत्तीच्या इसमास गट शिक्षणाधिकारी या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही. मात्र, असे असले तरी त्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळली की त्यांना आणखी ‘पुरवठा’ केला हे तपासातूनच समोर येणार आहे.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...