Crime News: जिल्ह्यातील पाचपेडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विमला विक्रम रुग्णालयात एका २८ वर्षीय महिलेस उपचाराच्या नावाखाली भूलचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आरोग्य कर्मचाऱ्याला अटक केली आहे. योगेश पांडे असं या आरोपीचं नाव असून, सध्या त्याची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे.
पीडित महिला गैसडी परिसरातील रहिवासी असून, ती एका सामान्य आजारासाठी २५ जुलै रोजी रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपीने तिला इंजेक्शन दिलं आणि ती बेशुद्ध पडताच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेला शुद्ध आल्यावर तिने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. बलरामपूरचे पोलिस अधीक्षक विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या गंभीर प्रकरणात पोलीस यंत्रणा वेगाने तपास करत आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचं वातावरण आहे. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसंच, रुग्णालय प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित होत असून, आरोपीला रुग्णांना इंजेक्शन देण्याची जबाबदारी कशाच्या आधारावर देण्यात आली, याचाही सखोल तपास सुरू आहे. या प्रकारामुळे खासगी रुग्णालयांतील सुरक्षाव्यवस्थेवर आणि महिला रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यावश्यक आहे.