अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील उपनगरीय भागातील नागरिकांनी अखेर महापालिकेवर हंडा मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सातत्याने पाणीटंचाई आणि अनियमित कचरा संकलनामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यासंदर्भात प्रशासनाला यापूव निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आज महिलांनी हातात पाणीभांडी घेऊन थेट पालिकेवर मोर्चा नेला.
मोर्चा आल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. पाणी आमचा हक्क आहे, महापालिका झोपलीय, कचऱ्याचा नाय नाय! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षणीय होता. यावेळी माजी नगरसेविका लताताई शेळके, किरण धुर्वे, अक्षय आरडे, बापू कोतकर, प्रमोद आबूज, युवराज दळवी, मनोहर बगळे, राजू हुलगे, सचिन कोतकर, गणेश कोतकर, गोरख हुलगे, विशाल ठुबे, दीपक भाबरकर, परमेश्वर ओटी आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.
या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश सरोदे आणि श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टने केले. सरोदे यांनी सांगितले की, महिनोंमहिने सहन करून आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिले, वेळ दिला, पण प्रशासनाने केवळ आश्वासनं देण्यापलीकडे काहीच केलं नाही. आम्हाला सहा ते आठ दिवसांनी पाणी मिळतं आणि तेही इतक्या कमी दाबाने की पाण्याचा उपयोग होण्याआधीच ते संपते. दुसरीकडे कचरा संकलनाची स्थिती अजून बिकट आहे. 10-15 दिवसांनी कचरागाडी येते. रस्त्यावर कुजणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आमचं घरं शुद्ध ठेवायचं, मुलांना रोगराईपासून वाचवायचं, पण प्रशासन काहीही करत नाही. यामुळेच आम्ही आज महिलांसह रस्त्यावर उतरलो आहोत.
महापालिकेचे अधिकारी एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतात, पण आम्हाला रोज सकाळी एक एक थेंब पाण्यासाठी धावपळ करावी लागते. स्वच्छता मोहिमा फक्त कागदावर चालतात, प्रत्यक्षात गल्लीबोळांत दुर्गंधी आणि साचलेला कचरा यामुळे जीवन असह्य झाले आहे, असेही सरोदे म्हणाले. पालिकेच्या प्रतिनिधींनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. पालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, कचरा संकलनाचे टेंडर अद्याप प्रक्रियेत असल्याने त्यात थोडा वेळ लागणार आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवली जाईल, असा शब्द देण्यात आला. मात्र आंदोलक नागरिकांनी फक्त आश्वासन नव्हे, तर कृती हवी असल्याचा ठाम पवित्रा घेतला. यावेळी अनिता दाते, सोनाली बोरुडे, सविता हुलगे, आरती सरोदे, अलका कोतकर, सीमा हुलगे यांसह अनेक महिला ठामपणे उभ्या होत्या.
केडगावकरांना माजी महापौर संदीप कोतकर यांची आठवण
माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात केडगावच्या नागरिकांना पाणीटंचाई आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा केडगावच्या नागरिकांना पाणी आणि कचऱ्याच्या समस्यांशी झुंजावे लागत आहे, ही खरोखरच मोठी शोकांतिका आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश सरोदे यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा, यापुढे उद्भवणाऱ्या नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासनास सामोरे जावे लागेल असा इशारा केडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.