मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (२६ फेब्रुवारी पासून) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर लक्षवेधी आंदोलन केले.
फसवणूक नको, आरक्षण द्या, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करणार्या सरकारचा निषेध, अशी घोषणाबाजी करीत विरोधकांनी विधानभवनाचा परिसरात दणाणून सोडला.मनोज जरांगे पाटलांना छळतंय कोण, महायुतीचा त्रिकोण, असे फलक देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात घेतले होते.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.दरम्यान, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण ५ दिवस चालणार असून अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी २७ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. ओबीसी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.