Pahalgam attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत करण्यात आली असून, ठार झालेल्यांमध्ये सुलेमान शाह उर्फ युनुस याची ओळख अधिकृतरीत्या पटली आहे. सुलेमानचा पहलगाम येथील पर्यटक हल्ल्यात थेट सहभाग होता. या भयंकर हल्ल्यात एकूण 26 लोक ठार झाले होते, ज्यामध्ये 25 पर्यटक आणि एक स्थानिक नागरिक होता. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. या घटनेनंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करत पीओकेमध्ये कारवाई करून 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत, सोमवारी (28 जुलै) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शाहची ओळख पटली आहे. घटनास्थळावरून एक अमेरिकन बनावटीची कार्बाइन, एक AK-47 रायफल, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान, यासिर आणि अली यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमान आणि यासिर यांचा सहभाग होता. या भागात चौथ्या दहशतवाद्याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी 12:30 वाजता दिली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “ऑपरेशन महादेव – ‘जनरल एरिया लिडवास’ मध्ये संपर्क स्थापित झाला आहे.” दुपारी 1:30 वाजता लष्कराने तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली आहे.