सोलापूर / नगर सह्याद्री : सध्या लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा, गौप्यस्फोट आदींना ऊत आला आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
प्रणितीताई शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावातील आयोजित हुरडा पार्टीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे विधान केलं आहे. जरी भाजपने ऑफर दिली तरी काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.
निवडणुकांमध्ये माझा दोन वेळा पराभव झाला आहे. असं असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो. जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे.
त्यामुळे आता मी दुसऱ्याचं (भाजपचं) म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.