संगमनेर । नगर सहयाद्री :-
राज्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. याउलट महायुतीमध्ये खूप मारामारी आहे. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असे सांगताना राज्यातील 125 जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल .येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते, यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन तीन बैठका झाल्या असून 125 जागांवर सहमती झाली आहे .उर्वरित जागांवर गणेश विसर्जन नंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
याच बरोबर महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असेही आमदार थोरात यांनी म्हटले असून इतर समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तसेच महाराष्ट्रात झालेली पक्ष फुट किंवा कुटुंबातील फूट ही राज्यातील जनतेला आवडली नसून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय महायुतीला आला आहे .
बारामती मध्ये व्हायरल झालेले पत्र हे प्रतिनिधिक असू शकते असे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कधीही धर्माचा भेद करत नाही. बंधुभाव ही आपल्या देशाची ताकद असून ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत मोठ्या मताधिक्याने 180 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.