Ahilyanagar Crime: शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग करून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात होता. या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत हॉटेलमधून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नजीक असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. शिर्डी जवळील साकुरी हद्दीत महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल उत्सवमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. याठिकाणी नाना शेळके नावाचा एजंट ग्राहकांच्या मोबाईलवर महिलांचे फोटो पाठवत होता. तसेच ग्राहकांकडून पैसे घ्यायचा आणि उत्सव हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यासाठी बोलवायचा.
ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. नाना शेळके हा हॉटेल उत्सवमध्ये अवैध वेश्या चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलवर एक बनावट ग्राहक पाठविला. याठिकाणी खरा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी येथे धाड टाकत कारवाई केली आहे. यामुळे हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी टाकलेल्या धाडमध्ये पोलिसांना येथे एक महिला आढळून आली. दरम्यान कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून संशयित आरोपी नाना शेळके आणि हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.