पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा खेळखंडोबा झाल्याने शासकीय तसेच ऑनलाइन कामकाज ठप्प झाले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारनेर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्याने तालुक्यातील बहुतांश भागात सरकारी बीएसएनएलसह खाजगी संस्थांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मागील पंधरा ते वीस दिवसांपासून भ्रमणध्वनींना रेंज नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाल्याने बँकांसह वित्तीय संस्था, सीएससी सेंटर, सेतु कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.
शाळा प्रवेशाचा कालावधी चालू झाला असल्याने नागरीक दाखल्यांसाठी सेतु कार्यालयात तर पैशांसाठी बँकांत गर्दी करीत आहेत. त्यातच इंटरनेटचा खेळखंडोबा झाला असल्याने त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. शासकीय तसेच सर्व निमशासकीय कामकाज आता ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. पण तालुक्यातील अनेक भागात इंटरनेट स्लो चालत आहे. तर काही ठिकाणी बंद पडले आहे.
त्यामुळे शासकीय कामकाजासह इतर वित्तीय संस्थांसह अनेक ऑनलाइन कामे थांबली आहेत. सावकाश चालणाऱ्या इंटरनेटचा फटका सुपा औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांना बसला आहे. पारनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीसह शहरी तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्ववत पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी संबंधितांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि इंटरनेट सेवेसह भ्रमणध्वनी रेंज पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.