अहील्यानगर । नगर सहयाद्री:-
खरीप हंगामासाठी पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता, कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी (दि. ३) रात्रीपासून आवर्तन सोडण्याचा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या आवर्तनाचा अहील्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभ लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सद्यस्थितीत लाभक्षेत्रात अपेक्षित पर्जन्यवृष्टी न झाल्याने खरीप हंगामाची पेरणी धोक्यात आली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
त्याचा विचार करून जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेत आवर्तन सुरू केले. अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोदा, पारनेर, कर्जत पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांतील येणार्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना पाणी मिळेल असे काटेकोर नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.