अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने एका आयटी इंजिनियरला 1.10 कोटींचा गंडा घालणारे आंतरराष्ट्रीय टोळीतील सहा आरोपी अहिल्या नगराच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले आहेत. देशातील स्थानिक आरोपींमार्फत लुटलेली रक्कम खात्यातून काढून भारतीय चलन हवालद्वारे डिजिटल करन्सीमध्ये वर्ग करून ते कंबोडियात पाठवण्यात आल्याचे व कंबोडियातील चिनी नागरिक देशभरात हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी 12.92 लाख रुपये रोख, एक कार आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत.
अहिल्यानगर येथील आयटी इंजिनियरला गंडा घालण्यात आल्यावर तपास करताना सायबर पोलिसांनी बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून निष्पन्न झालेल्या आणखी तीन साथीदार प्रविण दत्तु लोंढे (वय 38 वर्षे रा. वडवळ स्टॉप, कोळेगांव ता. मोहोळ जि. सोलापुर), शिवाजी साहेबराव साळुंके (वय 40 रा. वडवळ ता. मोहोळ जि. सोलापुर), सागर उर्फ केशव शंतजय कुलकण (रा.वाणी गल्ली, गणेश मंदिर जवळ, ता. मोहोळ ता.जि. सोलापुर) यांना अटक करण्यात आली.
राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, नागौर, राजस्थान) हा कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे खात्यातून काढून हवालामार्फत ते डिजिटल करन्सीमध्ये वर्ग करून परदेशात पाठवत असल्याचे समोर आल्यावर त्याला अटक करण्यात आली. राजेंद्रच्या चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्याच्या सांगण्यावरून हवाला नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करणाऱ्या दीपककुमार जोशी (रा. वसंत विहार, सोलापूर, मुळ रा. पाटण, गुजरात) यालाही अटक करण्यात आली. सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, अरुण सांगळे, मोहम्मंद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.