श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत
थेट भेट़ / शिवाजी शिर्के
श्रीगोंदा मतदारसंघात लढत कोणाशी होतेय या प्रश्नाचे उत्तर देताना विक्रमसिंह यांनी तत्काळ उत्तर देताना लढत विरोधकाशी होतेय असं उत्तर दिले. मात्र, विरोधक कोण हे सांगणे त्यांनी खुबीने टाळले. विरोधक कोण हे जनता ठरवणार आहे. विरोधक सारे मिळून एक आहेत. त्यांच्या सेटलमेंट चालू आहेत. ते एक नसते तर त्यांच्या रात्रीच्या बैठका झाल्याच नसत्या! त्या गुप्त बैठका मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला दिसेल की हे सारे मिळून एका ठरावीक उमेदवाराला पाठींबा जाहीर करतील. आज विरोधकांची लढाई जिंकण्यासाठी नाहीच! निकालानंतर दुसरा, तिसरा क्रमांक कोणाचा राहिल यासाठी चालू आहे. हे सामान्य जनता म्हणत आहे. हे माझे मत नाही. विरोधी सर्व उमेदवारांची धडपड कशासाठी हे सांगण्याची गरज राहिली नाही. निकाल सकारात्मक असणार हे नक्की! मताधिक्यापेक्षा विजय महत्वाचा आहे. विजय हा विजय असतो अशी भूमिका श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी नगर सह्याद्री सोबत विशेष मुलाखत देताना मांडली.
बहुरंगी लढती कायम पाचपुतेंच्या पथ्य्यावर!
महायुतीकडून सभा घेण्याचे नियोजन नाही. ज्योतिरादित्य यांची चांगली सभा झालीय. गावभेटी, मतदारसंघाचे चार- पाच दौरे झालेत. चांगला पतिसाद आहे. सर्व विरोधक एक झाले असल्याने सुज्ञ श्रीगोंदेकरांना उद्याचे चित्र दिसून आले आहे. तिरंगी- चौरंगी लढत पाचपुतेंच्या पथ्य्यावर पडली असल्याचे याआधी समोर आले आहे. नव्या उमेदीचा नवीन माणूस, चेहरा श्रीगोंदेकरांना दिला आहे.
निवडणुकीतील माघारी नाट्य हे मॅनेजच अन् खोक्यांच्या व्यवहारातूनच!
निवडणुकीत अनेकांना अर्ज भरले. मात्र, माघार घेताना जे चित्र दिसले ते अत्यंत शॉकींग होते. माघारीच्या दिवशी मी आत होतो. त्यावेळी एका उमेदवाराच्या माघारीसाठी राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी येतो. ज्याची माघार होते तो वेगळ्या पक्षाचा! माघार घेऊन ज्याला पाठींबा देतो तो त्या राष्ट्रीय पक्षाच्या विरोधी विचारधारेचा! हे सारं चक्रावणारं नाही का? हे सारं घडवून आणणारा पडद्यामागचा नेता तर आणखी वेगळ्याच विचारधारेचा! त्यामुळे सुज्ञ श्रीगोंदेकरांनी ही प्रक्रिया टेंडरचाच भाग असल्याचे ओळखले आहे. खोक्यांचाच व्यवहार यात झाला हे लपून राहिलेले नाही.
संधी विक्रम या नावाला नसून विक्रम बबनराव पाचपुते या नावाला मिळणार!
पाचपुते साहेबांच्या तब्येतीची अडचण आहे. त्यांचे रुटीन व्यवस्थीत असले तरी बोलायला मर्यादा आहेत. ज्याला राजकीय अंग आहे, तो निवडणुकीत शांत बसू शकत नाही. पाचपुते साहेब आजारी असले तरी या निवडणुकीत फिरत आहेत. वडिलांच्या डोळ्यात माझी निवडणूक अभिमानाचा क्षण आहे. मला जी काही संधी मिळणार आहे, ती संधी विक्रम या नावाला नसून ती संधी श्रीगोंद्यातील जनता विक्रम बबनराव पाचपुते या नावाला देणार आहेत. संधीचे सोने करण्याचे करण्याची जबाबदारी विक्रम नक्की करेल.
शांतता आणि संयम बाळगणे हे आमच्यावर दादांनी घालून दिलेले संस्कार
बदल होत असतो. आपण झाडाशी आपली तुलना केली तर परिस्थितीनुसार झालेले घाव त्या झाडावर दिसतात. वाढलेल्या पारुंब्या दिसतात. अनेक पावसाळे- दुष्काळ त्या झाडाने पाहिलेला असतो. सहन केलेले असते. अनेक चढउतार पाहिले. आपले- परके हे सारे आमच्या कुटुंबाने अनुभवले. बर्याच गोष्टी शिकता आल्या. मात्र, या संपूर्ण प्रवासात श्रीगोंद्यातील सामान्य जनतेने पाचपुते कुटुंबाची साथ खंबीरपणे दिली. विक्रमसिंह पाचपुते शांत दिसत असल्याची चर्चा असली तरी विचलीत न होता शांतता आणि संयम बाळगणे हे आमच्यावर दादांनी घालून दिलेले संस्कार आहेत.
दादांच्या सहवासात खूप काही शिकता आले आणि आज त्याचाच फायदा होतोय!
२०१४ मध्ये लोकसभेसाठीचा तरुण चेहरा म्हणून आपली उमेदवारी आली होती. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत बदल नक्कीच आहे. राजकारणात कष्ट महत्वाचे असतात. योग असतील तर सारे जुळून येते. त्यावेळी संधी मिळाली नसली तरी त्यावेळी जे संघटन कौशल्य शिकलो, अनुभव आला. त्यावेळचे नेते मंडळी आणि आजचे यात फरक आहे. कोणतीही निवडणूक त्याच त्याच मुद्दावर होत नसते. प्रत्येक निवडणूक वेगळ्या पद्धतीने करायची असते. २०१४ ला आम्ही सत्ताधारी पक्षात, मंत्री होतो. त्यावेळी कामाला मर्यादा होत्या. आता यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला. आजची परिस्थिती वेगळी जाणवते. जनतेकडून येणारा प्रतिसाद वेगळा आणि चांगला आहे.
बाजूला गेल्याची राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही आणि नव्हतीही!
आज पाचपुते कुटुंबात फूट पडल्याची चर्चा झडत असली तरी ते चुकीचे आहे. राजकीय प्रगल्भता नसणारा फुटला म्हणजे कुटुंबात फूट पडली असे म्हणणंच चुकीचे आहे. पाचपुते हे कुटुंब पाचपुते आडनावाच्या लोकांचे नसून कार्यकर्त्यांचे आहे. आमच्यातील एक बाजूला गेला म्हणजे फूट पडत नाही. जो बाजूला गेलाय त्याला राजकीय पार्श्वभूमी काहीच नव्हती. खूप मोठ्या राजकीय प्रगल्भतेचा माणूस फुटला तर ती फूट म्हणता येईल. आज काहीच झालेले नाही. जे काही झालेले आहे ते चांगल्यासाठीच झालेले आहे. त्याचे परिणाम देखील चांगलेच दिसताहेत.
संजय राऊतांचा भाष्य दुर्दैवी आणि ते नैराश्येतूनच!
संजय राऊतांचं ते भाष्य म्हणजे श्रीगोंद्यात महाविकास आघाडी पराभूत होतेय हे त्याच लक्षण आहे. पराभवाला बाप नसतो, त्याला कोणी जबाबदार नसतो म्हणून उद्याच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याचे काम आता सुरू झाले आहे. हेच संजय राऊत आदल्या दिवशी शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल, त्यांच्या आजारपणाबद्दल कोणी बोलले म्हणून त्यांच्यावर टीका करतात. त्यांना ज्ञान पाजळण्याचं काम करतात. दुसर्या दिवशी ते इकडे येतात आणि असे विकृत बोलतात. त्यांना पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळे त्या नैराश्येतून ते बोलू लागले आहेत.
मतदारसंघात कामे झाली हे मान्य करा, त्या कामांचा दर्जा सार्यांनीच तपासावा!
मतदारसंघात कामे झाली आहेत. वास्तव वेगळे आहे. दर्जा राखण्याचे काम प्रशासनाचे आहे. जी कामे चालू आहेत त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. काम खराब होत असेल तर समोर या आणि तक्रार करा. आम्हाला कोणालाही पाठीशी घालायचे नाही कारण आमचा त्यात काहीही इंटरेस्ट नाही. आमच्याकडे काम करणारे ठेकेदार हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आहेत. एका पक्षाने रस्त्याच्या कामाबाबत आंदोलन केले. मात्र, त्या रस्त्याचा ठेकेदार हा त्याच राजकीय पक्षाचा निघाला! याला काय म्हणणार तुम्ही! विकास कामे चालू असताना त्याच्या दर्जावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्याचे काम सर्वांचेच आहे. रस्ता खराब झाला असेल तर तो रस्ता कोणत्या तांत्रिक मुंद्यावर तयार केलाय हेही पाहण्याची गरज आहे. आज ग्रामीण मार्ग असे तयार झालेत आहे की त्या रस्त्यांवरुन १० टनांपेक्षा जास्त वजनाची वाहने गेली तर ते रस्ते खराब होणारच! हायवा सारखे अवजड वाहन मोकळे जरी गेले तरी त्याचे वजन १५ ते १८ टन असते. त्यात ते जर मुरुम, माती अथवा अन्य साहित्य भरुन गेले तर त्याचे वजन ४५ ते ५० टन होते. मग, अशा वाहनांसाठी हे अंतर्गत रस्ते आहेत का याबाबतही माहिती घेण्याची गरज आहे. चुकीच्या गोष्टीला शासन झाले पाहिजे ही आमची भूमिका कायम आहे.
ओपन चॅलेंज: गावेे तुम्ही निवडा, मी सोबत यायला तयार!
आम्ही काम करताना कोणालाही पाठीशी घालत नाही. निधी आल्यानंतर तो पुन्हा येत नाही. जनतेचा पैसा आहे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नाही. विकासाचा मुद्दा बोलायला सोपा वाटतो. मात्र, मी ओपन चॅलेंज देतो. सर्व गावांची यादी समोर ठेवा. त्यात विरोधकांनी गावांची नावे निवडयाची. त्या गावात आपण जाऊ. त्या गावात किती आणि कोणती कामे चालू आहेत हे विचारले तर त्यातील बहुतांश कामे ही पाचपुतेंनी मंजूर केलेली कामे निघतील इतका मला विश्वास आहे.
पाण्याचे उत्तम नियोजन कोण करु शकते या प्रश्नाच उत्तर फक्त पाचपुते हेच येणार!
श्रीगोंदा व नगर तालुक्यातील दोन गटांमधील गावे हे सारेच पर्जन्यछायेच्या टप्प्यातील आहेत. श्रीगोंदा जिरायत तालुका आहे. या तालुक्याचा काही भाग बागायती दिसत असला तरी पूर्णपणे पाटपाण्यावर आहे. श्रीगोंद्यातील पाण्याचा प्रश्न कधीच संपणार नसला तरी हा प्रश्न भेडसावणार नाही याची व्यवस्था आम्ही करु शकतो. पाण्याचे नियोजन उत्तम होते, त्यावेळी कोणतीच अडचण राहत नाही. तालुका जिरायत आहे की बागायत हे तालुक्याचा लोकप्रतिनिधी ठरवतो. जर लोकप्रतिनिधी योग्य असेल तर त्या पंचवार्षिकमध्ये तालुका बागायती असतो आणि लोकप्रतिनिधीला पाण्याचे ज्ञान नसेल तर तर त्या पंचवार्षिकमध्ये आमचा तालुका हा जिरायती असतो हे याआधी म्हणजेच १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०१९ मध्ये जसे समोर आले तसेच त्याआधीही दिसून आले आहे. हे मी नव्हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे. पाण्याचे योग्य नियोजन कोण करु शकते या प्रश्नाचं उत्तर तालुक्यातील जनतेकडून फक्त पाचपुते हेच येणार आहे.
पाणी कुठून सुटते यासह टीएमसी, क्युसेक्स याचे अर्थ सांगा!
श्रीगोंदा तालुक्यासाठी पाणी सुटते हे आजही अनेकांना सांगता येणार नाही. टीएमसी, क्युसेक्स हे शब्द समजून घेणे हे खूप लांबची गोष्ट झाली. श्रीगोंद्यासाठी कुठणं पाणी सुटतं इथून काहींची सुरुवात आज झाल्याचे दिसतेय असा टोला विक्रमसिंह पाचपुते यांनी शिवसेना उमेदवार अनुराधा नागवडे यांचा नामोल्लेख टाळत लगावला.
साखळाई पाणी योजना मार्गी लावणारच
नगर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या साकळाई योजनेसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह बबनराव पाचपुते यांनी लक्ष घातले आणि ते काम अंतिम टप्यात आले आहे. प्रक्रिया चालू आहे. देवेंद्रजींनी हा विषय अंतिम टप्प्यात आणला आहे. महाभकास आघाडीच्या सरकारने या कामात खोडा घालण्याचे पाप केेले. साकळाईसाठी दोन महत्वाचे मुद्दे आहेत. पाणी आरक्षण महत्वाचे! ओव्हरप्लोचे पाणी आरक्षण घेऊन करणार काय? ही योजना तांत्रीकदृष्ट्या योग्य आहे काय हे तपासून झाले आहे. साकळाईचा सर्व्हे झालाय. त्याचा डीपीआरही तयार झाला आहे. त्यातील तांत्रिक मुद्यांवर चर्चा चालू आहे. हे करण्यासाठी डींभे- माणिकडोह बोगदा खूप महत्वाचा आहे. हा बोगदा झाला तर साकळाईच्या जोडीने कुकडीच्या पाणी उपलब्धतेचा प्रश्न बर्यापैकी निकाली शकतो. मात्र, हा प्रश्न संपू शकत नाही. त्याला उत्तम नियोजन हाच पर्याय आहे.
विसापूरच्या धरणाचं ओव्हरप्लोचं आवर्तन आमच्यामुळेच!
ओव्हरप्लोच्या आवर्तनात नियोजनाची चूणुक आम्ही दाखवली. विसापूर तलाव ओव्हरप्लो झाला असला तरी अत्यंत चांगले नियोजन हेच कारणीभूत आहे. खूप वर्षानंतर या धरणाचं ओव्हरप्लोचे आवर्तन आपण काढू शकलो. त्यामुळे टेलच्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळाले. शेवटी हे पाणी बंद करण्याच्या विनंतीसाठी शेतकर्यांना यावे लागले हेही समजून घेण्याची गरज आहे.