प्रजेच्या दु:खाने दु:खी दिसणारा राजा नावाचा राज्यकर्ता आज खरेच दिसतोय का? बहिणीला तिच्या नजरेतील बळीचं राज्य दिसतंय का?
सारीपाट / शिवाजी शिर्के
अंधाराचे जाळे संपविणारा दिपोत्सव साजरा करण्यास आपण सारेच सज्ज झाले असून ‘समस्यांचे आकाश मोकळे’ होईल हा कित्येक वर्षांपासूनचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला भाबडा आशावाद या दिपोत्सवातही आपण जोपासणारच! दिपोत्सवाच्या निमित्ताने अंधाराचे, समस्यांचे जाळे कधीतरी फिटेल आणि सुखकर प्रवासाची चांगली वाट सापडेल असा आशावाद आपण सारेच ठेवून आहोत. मात्र, लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या सुरू आहे. विधानसभेत आपल्याला आपल्या भागाचा आमदार पाठवायचा आहे याचे भान नक्की जपा! टिवल्या-बावल्या करणारा, बापजाद्यांच्या पुण्याईसह पैशांच्या मस्तीवर तुम्हा- आम्हाला विकत घेणारा आमदार निवडून दिला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. सदसदविवेक जागा ठेवताना लाचार होऊन मतदान केंद्रात आपण जाणार नाही आणि चांगल्या विचाराचा पाईक राहिल असा आमदार मी निवडून देईल अशी शपथ या दिपोत्सवाच्या निमित्ताने घेऊ या!
सोशल मिडियाच्या माध्यमातून विशेषत: व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून दिपावलीच्या शुभेच्छा देणारे टेक्स्ट मेसेज आणि इमेजस खूप बोलक्या आणि अंतर्मुख करणाऱ्या आहेत. दिपोत्सवाच्या या शुभेच्छा देताना आणि घेताना मला अनेक प्रश्न पडलेत! अंधार जसा संपायला तयार नाही तसाच आशावादही! खरं तर आशावादी असलंच पाहिजे! पण किती दिवस, किती वर्षे आणि किती पिढ्या! समस्यांचे हे जाळे संपुष्टात येेईल आणि प्रकाशमान वाट सापडेल ही आशावादी भूमिका ठेवून अनेक वर्षांपासून आपण एकमेकांना दिपोत्सवाच्या शुभेच्छा देत आहोत…! पण, या शुभेच्छांमधून खरेच समस्यांचे जाळे नष्ट झाले आहे का? यावषचा दिपोत्सव समस्यांचे जाळे संपुष्टात आणण्यासाठीच आला आहे असे वाटते! लोकशाहीचा मोठा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीचा माहोल सध्या सुरू आहे. दिपोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या भागासाठी अत्यंत चांगला आमदार निवडण्याची संधी आली आहे. या संधीचे सोने करायचं की माती हे आता तुम्हाला ठरवायचं आहे.
उद्योग व्यवसाय असू देत की राजकारण यामध्ये विशिष्ट कुटुंबच यशस्वी का होतात आणि त्यांनाच यश का मिळते? जिद्द, चिकाटी आणि उत्तम अर्थकारणाचे गणित जुळवत उद्योग व्यवसायात यशस्वी झालेले अनेकजण आज नव्या पिढीसाठी पांथस्थाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत तरुण नोकरीच्या मागे न लागता नव्या उमेदीनं उद्योग- व्यवसायाच्या वाटा निवडू लागलेत. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा तरुण तयार होत असताना त्याला पाठबळ देणारी शासकीय यंत्रणा कितपत सकारात्मक भूमिका पार पाडतेय हे पाहण्याची गरज आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय केला पाहिजे, असा सल्ला देणारा तुमच्या भागातील कथीत समाजसेवक, लोकप्रतिनिधी तुमच्या प्रयत्नांना कितपत पाठबळ देतो हेही तपासण्याची गरज आहे. प्रजेच्या दु:खाने दु:खी आणि सुखाने सुखी दिसणारा राजा नावाचा राज्यकर्ता आज खरेच दिसतोय का? भावाला बळीचं राज्य मिळू दे अशी प्रार्थना करणाऱ्या बहिणीच्या नजरेत बळीचं राज्य दिसतंय का? घराघरात पणत्या पेटत असताना विचारांच्या पणत्या कधी पेटणार आहेत? खरं तर या अशा प्रकारच्या पणत्या पेटूच नयेत यासाठी तुमच्या अनेक पिढ्यांना झुलवणारी बांडगुळं गावागावात तयार होताहेत आणि ती खरी शोकांतिका आहे.
लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभेचा फड सध्या गाजत असताना आता चर्चा झडत आहे ती उमेदवार कोण आणि कसा? गावागावातील पारांवर चर्चा झडणार आहे ती याच निवडणुकीची. घरचे टुकडे मोडून, कामधंदा सोडून कोण असेल उमेदवार, कोण येईल निवडून, कोणाला मिळेल उमेदवारी याची चर्चा करणारे महाभाग कमी नाहीत! चर्चा झालीच पाहिजे! पण, या साऱ्या चर्चांमधून मतदानाला जाताना आपण योग्य उमेदवार निवडतोय का याचेही आत्मपरीक्षण होण्याची गरज आहे. नेत्याने, पक्षाने उमेदवार दिला म्हणून मतदान करणार? पैसे घेतले म्हणून मतदान करणार की गावच्या जिरवाजिरवीच्या घाणेरड्या राजकारणात तो तिकडे म्हणून मी इकडे असा विचार करून मतदान केंद्रात जाणार याचे आत्मचिंतन या दिपोत्सवाच्या निमित्ताने होण्याची गरज आहे.
खरं तर राजकीय पक्ष आणि त्यांच्या कथीत नेत्यांनी त्यांचा उमेदवार निवडीचा तराजू भंगारात कधीच विकून टाकलाय! कालच्या निवडणुकीतील विरोधक आज मित्र होतातच कसे? त्यांच्यासाठी हाणामाऱ्या, पोलिस कोठडीची हवा खाणारे कार्यकर्ते अक्षरक्ष: मुर्खात निघतात! सोसायटी- ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पोलिस ठाण्यापर्यंत हवा खाऊ घालणारा विरोधक आज अचानक नेता कसा होऊ शकतो? दर निवडणुकीला वेगवेगळ्या पक्षात जाणाऱ्या अर्थकारणातील पटाईत नेत्याला नेता तरी कसे म्हणावे असे एक ना अनेक प्रश्न आजच्या तरुणाईच्या मनात आहेत. एकाच घरात सत्ता पाणी भरत असेल तर त्या सत्तेचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला याचे आत्मपरीक्षण कधी होणार आहे की नाही? कालच्या निवडणुकीत एकमेकांचा जाहीर पानउतारा करणारे नेते आज गळ्यातगळे घालून फिरत असतील तर असे करताना त्यांना असा कोणता साक्षात्कार झाला की दोघेही सज्जन झालेत आणि एकमेकांना सज्जन वाटू लागलेत!
मित्रांनो, या सर्व मंडळींनी असे अनेक निर्णय घेताना कधी तुमच्याशी चर्चा केली का हो? मग, तरीही ते एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि वाट्टेल त्यावेळी एकमेकांच्या गचांडी धरतात कसे? ‘तुम्हाला त्यांनी गृहीत धरलेय’, हे त्यामागचे सरळ उत्तर आहे. तुम्हाला गृहीत धरुन वाट्टेेल तसे निर्णय घेतले गेलेत आणि घेतले जाणार आहेत हे विसरु नका? निर्णय घ्यायला, उमेदवार निवडायला आणि मतदान करण्यास आम्ही आमचे सक्षम आहोत हे जाहीरपणे सांगता येत नसेल तर मतदानातून दाखवून द्यायचे काम तुम्हाला करावे लागणार आहे.
कोणीतरी येईल आणि आपल्यासाठी, आपल्या शहर, गावासाठी चांगलं काही तरी करील हा आशावाद दूर ठेवला पाहिजे! गावच्या आणि परिसराच्या विकासात्मक प्रक्रियेतील टक्केवारीतील ठेकेदार बाजूला ठेवू या! लाळघोटेपणाला एक मर्यादा असते! तुम्ही लाळघोटेे नाहीत आणि दावणीला बांधलेले मतदार नाहीत हे कधीतरी ठामपणे दाखवून देण्याची वेळ आलीय! या संधीचे सोनं करायचे की माती हेही एकदाचे ठरवून टाका! मला असे वाटते आता दिपोत्सवाच्या निमित्ताने का होईना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची गरज निर्माण झालीय! त्यातच उद्याच्या खऱ्याखुऱ्या दिपोत्सवाची वाट प्रकाशमान असणार आहे! लाळघोट्या राजकारणापेक्षा वैचारिक क्रांतीतून नवी पाऊलवाट प्रकाशमान करण्यासाठी घराघरात वैचारिक पेणती पेटवून या! ही पणतीच उद्याची निर्णायक मशाल ठरणार असल्याचा आशावाद दिपोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त करतो! दिपावली- पाडव्याच्या सर्व वाचक, प्रेक्षक, हितचिंतक, जाहीरातदार-वृत्तपत्र विक्रेते आणि सहृदयींना ‘नगर सह्याद्री’ आणि ‘न्यूज 24 सह्याद्री’ परिवाराच्या वतीने शुभेच्छा!