पारनेर । नगर सहयाद्री
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास मंगळवार पासून सुरूवात झाली असून पारनेर मतदार संघात पाहिल्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १९ अर्ज नेले आहेत. प्रमुख उमेदवारांपैकी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांच्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीने तिन अर्ज घेतले आहेत. दरम्यान, मंगळवारी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
अर्ज घेतलेल्या उमेदवारांमध्ये पारनेर येथील भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी स्वतः अर्ज घेतला आहे. (विळद, ता. नगर) येथील अमोल शिवाजी कांबळे यांच्यासाठी अजय शिवाजी कांबळे यांनी, हंगे येथील दिनेश सुभाष बोरूडे राणी नीलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून तिन अर्ज घेतले, पिंपळगांवरोठा येथील चंद्रकांत राजाराम कुलकर्णी यांनी सुजित वसंतराव झावरे यांच्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी पक्षासाठी दोन तर अपक्ष म्हणून एक अर्ज खरेदी केला आहे.
निघोज येथील अनिल शिवाजी शेटे यांनी डॉ. पद्मजा श्रीकांत पठारे यांच्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासाठी एक तर अपक्ष म्हणून एक अर्ज खरेदी केला आहे. रांधे येथील संतोष भाउसाहेब साबळे यांनी डॉ. श्रीकांत तान्हाजी पठारे यांच्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी २ तर अपक्ष म्हणून १ अर्ज घेतला. राळेगणसिध्दी येथील किसन मारूती पठारे यांनी स्वतः साठी अपक्ष म्हणून दोन अर्ज खरेदी केल्याची माहिती तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मा. आ. विजय औटी यांच्यासाठीही अर्ज
विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजय भास्करराव औटी यांच्यासाठी पारनेर येथील संतोष सिताराम चेडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज खरेदी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर औटी हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. औटी यांच्यासाठी अर्ज खरेदी करण्यात आल्याने सोशल मिडियावरील चर्चेला दुजोरा मिळाला आहे.