नागरिकांत घबराट; नागरिकांनी सतर्क रहावे : धाडे
पारनेर | नगर सह्याद्री
येथील वरखेड मळा परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सतीश राजाराम कावरे (वय ५२) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात कावरे जखमी झाले. परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे घबराट निर्माण झाली आहे.
शहरात वरखेड मळा येथे गुरुवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास घराजवळ असणार्या डोंगराच्या बाजूने जनावरे चारत असताना जवळपास बिबट्याचे चार पिल्ले होते. मात्र, कावरे यांनी ते पाहिले नाही. पिलांमुळे बिबट्याने थेट सतीश कावरे यांच्यावर हल्ला केला. या वेळी त्यांनी आपल्या हाताने प्रतिकार केला. तेथेच असणार्या नितीन कावरे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.
या हल्ल्यात कावरे यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान घटनेची माहिती समजताच वनक्षेत्रपाल गजानन धाडे, वनपाल साहेबराव भालेकर, एम. वाय. शेख, वनरक्षक अंकराज जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
हल्ला झालेल्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला असून, पिंजर्यात विवट्याचे चार पिल्ले ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. शेतातील कामे, तसेच जनावरे चारण्यासाठी समूहाने जावे. लहान मुलांची घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तालुयात बिबट्याचे प्रमाण पाहता नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना वनक्षेत्रपाल गजानन धाडे यांनी नागरिकांना दिल्या.
बिबट्या मादीला पकडण्यात यश
हल्ल्याची घटना घडलेल्या ठिकाणी व बछडे असलेल्या जागेवर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री पिंजर्यामध्ये मादी अडकली. तात्काळ बिबट्या मादी पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.