कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी वापरले देवाचे पैसे
सारिपाट । शिवाजी शिर्के
शनि शिंगणापूरमधील एकाही घराला दरवाजा नाही आणि येथे कोणी चोरी केली तर त्याचे डोळे जातात असा जो काही महिमा या देवस्थानचा होता, तो महिमा खोटा असल्याचे येथील विश्वस्त मंडळानेच पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. खरे तर शनिदेवाचा प्रकोप या विश्वस्त मंडळासह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांबाबत नक्कीच होणार! मात्र, त्याही पलिकडे जे काम दोनअडीचशे कर्मचाऱ्यांमध्ये होणे शक्य असताना तब्बल अडीच हजार कर्मचारी (नव्हे कार्यकर्ते) दाखवून त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या टोळीला शनिदेव काय द्यायची ती शिक्षा देईलच! मात्र, त्याआधी भाविकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांबाबत राज्य शासनाने याबाबत कठोरातील कठोर पावले उचलावी आणि यातील साऱ्यांना शनिचौथऱ्यावरच फाशी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या. असे तीन-चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले, असे लंघे म्हणाले. या शिवाय बोगस भरतीवरही त्यांनी भाष्य केले. खरेतर हा घोटाळा शंभर कोटींचा नक्कीच नसून तो काही हजार कोटींचा नक्कीच असणार असल्याचे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.
सव्वा दोन हजार कार्यकर्ते दाखवले कर्मचारी! त्यांना दिला घरबसल्या पगार!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केलेली येथील अनागोंदी आणि त्यातील आकडेवारी पाहता डोळे विस्फारुन जात आहेत. ट्रस्टने केलेल्या मनमानी नोकरभरतीची माहिती शासकीय चौकशी अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. धर्मादाय सहआयुक्त पुणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही चौकशी केली होती. देवस्थानच्या रुग्णालय विभागात 327 कर्मचारी कार्यरत दाखविले होते. मात्र रुग्णालयात चौकशीदरम्यान एकही रुग्ण आढळला नाही. या रुग्णालयात 15 खाटा होत्या व 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असल्याचे दाखविले. प्रत्यक्षात 4 डॉक्टर, 9 कर्मचारी हजर होते. बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी असल्याचे दाखविले. भक्त निवासात 109 खोल्या असून त्यासाठी 200 कर्मचारी दाखविले. भक्त निवासातील खोल्यांच्या स्वच्छतेसाठी 200 कर्मचाऱ्यांशिवाय वेगळे कर्मचारी आहेत. देणगी विभागात देणगी स्वीकारण्यासाठी 8 तर तेल विक्रीसाठी 4 असे एकूण 12 काऊंटर होते. प्रत्येक काऊंटरवर दोन कर्मचाऱ्यांशिवाय कोणी आढळले नाही पण तिथे 325 कर्मचारी नेमल्याचे दाखविले. पार्किंग विभागात 163 कर्मचारी दाखविले, प्रत्यक्षात 13 कर्मचारी आढळले. वृक्ष संवर्धन विभागात 83, शेती विभागात 65, पाणीपुरवठा विभागात 79, गोशाळा विभागात 82 कर्मचारी दाखविले. गोशाळा विभागात प्रत्यक्ष 26 कर्मचारी काम करतात. सुरक्षा विभागात 315 कर्मचारी असल्याचे दाखविले. वाहन विभागात वाहनांची संख्या 13 पण कर्मचाऱ्यांची संख्या 176 इतकी होती. विद्युत विभागात एक युनिट असून 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले. देवस्थानकडून 2 हजार 474 कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, या देवस्थानमध्ये जुने कर्मचारी केवळ 258 इतकेच आहेत. याचाच अर्थ सव्वा दोन हजार कर्मचारी वाढवून त्यांना घरबसल्या पगार देण्याचे पाप देवस्थानच्या विश्वस्तांनी केले.
विठ्ठलराव, क्लीन चिट देणाऱ्या त्या अधिकाऱ्याचे काय?
आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या लक्षवेधीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या देवस्थानमधील गैरप्रकार समोर आणला. शनि शिंगणापूरच्या शनि मंदिरातील घोटाळ्यांप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यातील घोटाळेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जातील. बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याची सखोल चौकशी होणार असली तरी याआधी धर्मादायच्या एका अधिकाऱ्याने येथील भ्रष्ट कारभारावर बोट न ठेवता क्लीन चिट दिलेली होती. त्या अधिकाऱ्याचे काय? चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होण्याआधी त्याला निलंबन केले जाणार का असा सवाल आता शनिभक्त करत असून याप्रश्नी आता स्थानिक आमदार या नात्याने विठ्ठलराव लंघे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
देवेंद्रजी, ‘धर्मादाय’ची यंत्रणाच भ्रष्ट; आधी येथील बाजार थांबवा!
देवस्थान ट्रस्टमध्ये नोकरभरती व इतर घोटाळे सुरू असताना धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आली नाही, असे म्हणणेच धाडसाचे ठरणार आहे. आता हा घोटाळा उघड झालाच आहे तर मग हे धर्मदाय कार्यालय काय करत होते! त्यांना जाणाऱ्या मलिद्याचीही चौकशी होणार आहे का? ट्रस्ट कायद्यानुसार कोणताही निर्णय आणि त्यातही कर्मचारी भरतीचा निर्णय होताना धर्मदाय कार्यालयास अवगत करणे आणि त्यांची मान्यता घेणे आवश्यक असते. येथे तर अडीच हजार कर्मचाऱ्यांचे वेतन देवस्थानच्या बँक खात्यातून जात होते. मग, असे असताना धर्मदाय उपआयुक्त कार्यालय कोणाचा मलिदा खात होते याची चौकशी होण्याची गरज आहे. मुळात या कार्यालयानेच बाजार मांडला आहे. जिल्ह्यातील अनेक देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळ नियुक्त होताना एजंटांच्या माध्यमातून बोल्या लावल्या जातात आणि जास्त प्रसाद देणाऱ्याची वण विश्वस्त मंडळात लावली जाते हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे देवेंद्रजी यांना जर ही भ्रष्ट यंत्रणा मोडीत काढावीच अशी इच्छा असेल तर त्यांनी आधी ही धर्मदाय कार्यालये आणि त्यातील दलाल यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.