मुंबई । नगर सहयाद्री:- 
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. महिलांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. आता चर्चा अशी आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिना संपला असून, पुढील महिन्यात, म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत पैसे मिळू शकतात, असे संकेत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या महिन्यात होणार असल्याने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि त्या काळात कोणताही निधी लाभार्थ्यांना दिला जाणार नाही.
यामुळे आता अंदाज आहे की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येऊ शकतात, म्हणजे महिलांना पुढच्या महिन्यात एकत्रित ₹३००० मिळू शकतात. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुका पार पडणार आहेत, त्यामुळे आचारसंहितेच्या काळात आर्थिक मदत दिली जाणार नाही. लाभार्थ्यांनी लवकरच योजनेअंतर्गत निधी मिळेल याची प्रतीक्षा सुरू ठेवावी.



 
                                    
