मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतल्याने आता उकाड्याचा चांगलाच तडाखा बसू लागला आहे. ‘ऑक्टोबर हीट’ची झळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत असून, नागरिक अक्षरशः गरम हवेमुळे हैराण झाले आहेत. कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, पुढील दोन दिवस या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ओसरत चालला असून, समुद्र सपाटीपासून सुमारे १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून आकाशात अंशतः ढगाळ वातावरण असले, तरी उन्हाचा चटका काहीसा अधिक जाणवत आहे.
काल रविवारी पहाटेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यात ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रुझ येथेही तापमान ३४ अंशांवर गेले. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले असून, दुपारी उन्हाचा तीव्र झगमगाट जाणवतो आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानुसार मॉन्सूनने १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून काढता पाय घेतला आहे. अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा ठरली आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून पूर्णतः परतण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, थेट उन्हात जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास योग्य उपाययोजना कराव्यात, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यात ४ दिवस धो-धो कोसळणार
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यातून पूर्णपणे निरोप घेतला असून, आता वातावरण पूर्णतः कोरडे झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनच्या परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र १५ ऑक्टोबरपासून परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची अपेक्षा आहे.
वादळी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळ भरून येणे आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये ढगाळ हवामान तसेच वादळी वारे (३०-४० किमी/तास वेगाने) आणि विजांसह पावसाची स्थिती राहील.
विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचे प्रमाण अधिक असू शकते, ज्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. याउलट, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि गोवा भागात १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत विजा आणि वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
या पावसाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पावसापासून व वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवावे. तसेच, पिकांच्या कापणीपूर्वी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याशिवाय, वाहनचालक आणि नागरिकांनी वादळी वाऱ्यांमुळे होणाऱ्या धोक्याबाबत सतर्क राहावे.
तापमानातही चढ-उतार
महाराष्ट्रातील हवामान बदलत असताना, राज्यातील विविध भागांमध्ये तापमानातही चढ-उतार होऊ शकतात. सध्या किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असून, पावसामुळे काही ठिकाणी थंडी वाढू शकते. हवामान विभागाने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये राज्यात सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे शेतीसाठी हा कालावधी महत्त्वाचा ठरेल.