अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१२ वाजता ‘अजय ज्वलर्स’जवळील ग्रामीण गल्ली, भिंगार येथे घडली. आरोपींची नावे निलेश सुनिल पेंन्डुलकर, अजय सुरेश अंबीलवादे , प्रविण सुनिल पेंन्डुलकर अशी आहे. आरोपींच्या घरी सुरू असलेल्या घरगुती वादामुळे त्यांनी ‘डायल ११२’ वर कॉल करून मदत मागितली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रमोद मधुकर लहारे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना, आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण झाला. पोकॉ प्रमोद लहारे यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
सासरच्या मंडळींची विवाहितेला मारहाण; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा
अहिल्यानगर:
कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना भिंगार परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, शेलारमळा (बुऱ्हाणनगर) येथील 28 वर्षीय विवाहितेने फिर्यादी दिली. २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ब्राम्हण गल्ली, भिंगार येथे ही घटना घडली. मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ केली. फिर्यादीत नमूद आहे की, आरोपींपैकी एका व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि विवाहितेच्या डाव्या हाताला चावा घेतल्याचेही नमूद केले आहे. दुसऱ्या आरोपी महिलेनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर तिसऱ्या आरोपीने लाकडी दांडक्याने हल्ला केला. या मारहाणीत विवाहिता जखमी झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.एस. म्हस्के करत आहे.
संभाजीनगर महामार्गावर हिट अँड रन; अपघात दोन सख्खे भाऊ गंभीर
अहिल्यानगर
संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल सनी पॅलेसजवळ एक भीषण हिट अँड रन अपघाताची घटना घडली. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात ओंकार संतोष गवते (वय १९) आणि त्याचा लहान भाऊ श्रेयस संतोष गवते (वय १२) दोघे गंभीर जखमी झाले आहे. दोघेही बहिणीला भेटण्यासाठी तपोवन रोडकडे जात असताना अपघात झाला. धडक लागल्यामुळे ओंकार आणि श्रेयस दोघेही रस्त्यावर कोसळले. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. जखमी ओंकार गवते यांनी रुग्णालय दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.



