मुंबई । नगर सहयाद्री
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता. यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती. सरकारच्या या जीआरमुळे ओबीसी समाज नाराज झाला होता.
या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात दंड थोपटत सरकारलाच न्यायालयात खेचण्याचे ठरवलंय. छगन भुजरबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे.
छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरु आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरु होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत.
छगन भुजबळांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या जीआरला खोड करून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष घेणार नाहीत, असंही मनोज जरांगे म्हणाले.
सरसकट ओबीसीची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही: मुख्यमंत्री फडणवीस
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण संपविण्याआधी सरकारच्या वतीने दिलेल्या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जीआर काढला. मात्र यावर काही ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलं आहे.मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. ओबीसींच्या ताटातलं काढून घेण्याचं काम आम्ही कुठेही केलेलं नाही. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सरसकट ओबीसीची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.