अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात व उपनगरात चोऱ्या सुरुच आहेत. अशातच आता चक्क पोलीस मुख्यालयातही चोरट्यांनी चोरी केली आहे. गेल्या 15 वर्षांपासून पोलीस मुख्यालयात कुक म्हणून कार्यरत असलेल्या सुनंदा नरहरी ढाकणे (वय 45) यांच्या ब्लॉक नं. 41, रूम नं. 507 येथील घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 17 जुलै 2025 रोजी घडली. पोलीस मुख्यालयासारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनंदा ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या बहिणी मनिषा बाबासाहेब ढाकणे यांच्यासह शिरूर कासार येथे दशक्रिया विधीसाठी जाण्याच्या तयारीत होत्या. दुपारी त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या. रात्री 8:45 वाजता परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा आतून कडी लावलेला आढळला. लाथ मारून दरवाजा उघडताच त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसले. पाठीमागील दरवाजा उघडा असल्याने अज्ञात चोरट्याने तिथून प्रवेश केल्याची खात्री झाली.
लोखंडी कपाट आणि देवघरातील ड्रॉवर तपासताना 15 हजार रुपयांचे सोन्याचे झुबे, 14 हजारांची सोन्याची अंगठी, 12 हजारांचे गंठण, 12 हजारांचे डोरले, अडीच हजारांच्या चांदीच्या पायातील पट्ट्या, 2,500 ची चांदीची चैन आणि 10 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. पोलिसांनी फिंगरप्रिंट आणि डॉग युनिटसह घटनास्थळाची पाहणी केली. सुनंदा ढाकणे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, तपास मपोहेकॉ गडाख करत आहेत.