स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती करत आयुक्त व अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- 
शहरात रस्त्याच्या कडेला साचलेले मातीचे ढिगारे, वाढलेले गवत, पडलेले बांधकाम साहित्य याकडे स्वच्छता निरीक्षक दुर्लक्ष करत असल्याने व उपायुक्तांचे त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने आ. संग्राम जगताप गुरुवारी मनपात झालेल्या स्वच्छता आढावा बैठकीत संतप्त झाले. त्यांनी आयुक्तांसह अधिकारी व स्वच्छता निरिक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. शहरात स्वच्छतेबाबत महापालिकेने ठोस भूमिका घेतली पाहिजे. स्वच्छता निरीक्षक त्यांच्या अखत्यारीत असलेल्या भागात लक्ष देत नाहीत. रस्त्यावर कचरा पडणार नाही, याची दक्षता त्यांनी प्रत्यक्ष फिरून घेतली पाहिजे. उपायुक्तांनी सातत्याने लक्ष ठेवून आढावा घेणे अपेक्षित आहे. मात्र, कोणीही यात लक्ष घालत नाहीत. त्यामुळे अशा स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करावी. उपायुक्तांनी नियंत्रण न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईची मागणी मी स्वतः करेल, असा इशारा आमदार जगतापयांनी दिला. तसेच जे स्वच्छता निरिक्षक जबाबदारीने काम करणार करत नाहीत त्यांच्यावर तात्काळ बिन पगारी कारवाई करा तरीही सुधारणांना न झाल्यास त्यांचे डिमोशन करा, स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घ्या अशा सूचना आमदार जगताप यांनी यावेळी दिल्या.
शहरात स्वच्छता राहण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. त्यासाठी 80 घंटागाड्या कचरा संकलन करण्यासाठी कार्यरत झाल्या. मात्र, घंटागाडी येऊन गेल्यावर नागरिक पुन्हा रस्त्यावर कचरा आणून टाकत आहेत. अशा नागरिकांवर आता मनापा 500 ते 1 हजारांची दंडात्मक कारवाई करणार आहे. तसेच, सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात साफसफाईचे काम केले जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. शहराच्या स्वच्छतेबाबत ठोस भूमिका घेत आमदार संग्राम जगताप गुरुवारी झालेल्या महानगरपालिका बैठकीत चांगलेच संतप्त झाले. बैठकीदरम्यान त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेतली तसेच आयुक्त यशवंत डांगे व अधिकाऱ्यांनाही यांनाही धारेवर धरत शहरातील स्वच्छतेसंदर्भात जाब विचारला. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने आपल्या विभागातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना द्याव्यात. जर नागरिक ऐकले नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जर निरीक्षकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर मी स्वतः त्यांच्या आणि मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करीन, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला. महानगरपालिकेमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस उपायुक्त संतोष इंगळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे व श्रीकांत निंबाळकर आदींसह सर्व स्वच्छता निरिक्षक उपस्थित होते.
नगर शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा: आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन
आपल्या नगर शहरात कचरा संकलनाचे नव्याने काम सुरू झाले असून, सुमारे 80 कचरा गाड्या कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. कचरा फक्त कचरा गाडीतच टाकून शहर स्वच्छ ठेवण्यास महानगरपालिकेला सहकार्य करावे. नगर ही आपली जन्मभूमी व कर्मभूमी आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता आपल्या मातृभूमीला स्वच्छ व सुंदर ठेवावे. देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदोरप्रमाणेच नगरलाही स्वच्छतेत एक नंबरवर आणायचे आहे. नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर हे उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल. शहरातील स्वच्छतेचे नियम सर्वांनी पाळावेत, असे आवाहन करत त्यांनी चेतावणी दिली की, जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतील, त्यांच्यावर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून आपले नगर शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श ठेवावे.
शहरात स्वच्छता राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, नगर शहरात स्वच्छता राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी नव्याने कचरा संकलनाची एजन्सी नेमण्यात आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी रोज सकाळी स्वच्छता करत असतात. मात्र स्वच्छता झाल्यावर नागरिक पुन्हा रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशांवर आता मनपाचे कर्मचारी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे आपले नगर शहर सतत अस्वच्छ दिसते. त्यामुळे यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका 500 ते 1 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहे. भिस्त्भाग परिसरात काहींवर अशी कारवाई केलीही आहे. नगर शहरात उद्या शुक्रवार सकाळपासून विविध भागांमध्ये डीप क्लीन विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या कामी नागरिकांनी सहकार्य करावे व आपले नगर शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सहकार्य करावे.



 
                                    
