अहमदनगर | नगर सह्याद्री
शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मआज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं आणि शिकावं लागतं अशी स्थिती आहेफ, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला आहे. लोणी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखाना कार्यस्थळावर गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करत स्थापना केली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना गणेश स्थापनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी निवासस्थानी गणेश पूजा न करता कारखाना कार्यस्थळावरच विखे परिवार गणेशाची स्थापना करतात. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, गणरायाच्या आगमनाआधी राज्यातील सर्व धरणे भरली, हा खरा आनंद आहे. आज शेतकरी सुखावला आहे. काही भागात दुर्दैवानं अतिवृष्टीचा संकट उद्भवलं. मात्र, राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे.
हा विकास करण्यासाठी गणरायाने शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली. नातू अभिमन्यू याच्याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखेंनी आज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं आणि शिकावं लागतं अशी स्थिती असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे, असे वक्तव्य केले.
याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कार्यकुशल आणि समृद्ध, असे फडणवीसांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक विकासकामे केली. अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांना आपण काही करू शकलो नाही याच शल्य आहे. त्यामुळे व्यक्ती द्वेषातून फडणवीस यांच्यावर टीका केली जाते. त्यांच्यावर टीका केल्यानं त्यांचे महत्त्व आणि त्यांचं काम कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.