मुंबई / नगर सह्याद्री –
Vijay Shivtare On Cabinet Expansion : महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाला ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्री असं महायुतीचं मंत्रिमंडळ आता असणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्याही अनेक मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही माजी मंत्री पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वांना मंत्रिपदाची संधी मिळावी म्हणून मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र, यानंतरही शिवसेनेतील काही दिग्गज नेते नाराज आहेत. आता यासंदर्भात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. तसेच आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही, असं विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विजय शिवतारे काय म्हणाले?
“माझ्यासाठी मंत्रिपद महत्वाचं नाही. माझ्यासाठी काम करणं महत्वाचं आहे, कारण मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. मला दु:ख एवढं आहे की महाराष्ट्र कुठे चालला आहे? तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि तेथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशा माणसांच्या हातात सत्ता देत आम्ही महाराष्ट्र पुढे नेल. पण आता आपण मागे चाललोय का? आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय का?”, असे सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केले.
‘…म्हणून शंभर टक्के नाराजी’
“मला माझं नाव मंत्रिमंडळातून कट झाल्याचं दु:ख नाही. पण लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. मात्र, तसं न झाल्यामुळे शंभर टक्के नाराजी आहे”, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं. तसेच आता पुढची भूमिका काय? असं विचारलं असता शिवतारे यांनी म्हटलं की, आता अडीच वर्षांनंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला त्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं करून घेणं महत्वाचं आहे. मला मंत्रिपदाबाबत राग नाही. पण वागणुकीबाबत जास्त राग आहे”, असं म्हणत शिवतारे यांनी खदखद व्यक्त केली.