भारतीय लष्कराचा दहतशवाद्यांच्या मुळावरच घाव
नवी दिल्ली | नगर सह्याद्री
पाकिस्तानात कटकारस्थान रचून भारतात रक्तपात घडवणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी संघटनांना भारताने त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. 7 मे रोजीच्या रात्री भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची झोपच उडवली. अवघ्या 25 मिनिटांत 9 ठिकाणांना जमीनदोस्त करत लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या कारवाई तब्बल 90 दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय लष्कराने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा आणि दहशतवाद्यांचा केलेला खात्मा या यशस्वी कारवाईचे कौतुक व अभिनंदन होत आहे. भारतात आतापर्यंत झालेल्या अनेक हल्ल्यांचे भारताने 7 मे रोजीच्या रात्री उत्तर दिले. भारतीय लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे भूईसपाट झाले.
लष्कराच्या तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या आणि प्रशिक्षण दिले जाणाऱ्या ठिकाणांनाच लक्ष्य करण्यात आले. याच ठिकाणांवर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले गेले. त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. 6 आणि 7 मेच्या रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले होते.
लष्कराकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त केले. नऊ ठिकाणी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 90 दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, मागील तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे उभे केले जात आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे अड्डे पसरलेले आहेत.
पिक्चर अभी बाकी है!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. या प्रकरणावर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एक सूचक विधान करणारे ट्विट केले आहे. जर पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी हल्ले शक्य आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी संकेत दिले. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पिक्चर अभी बाकी हैफ !असे म्हटले असून भारताची कारवाई आणखी पूर्ण झाली नसल्याचे म्हटले आहे.
दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी: गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी, आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे, असे म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर : पंतप्रधानांचे कारवाईवर लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर या क्षेपणास्त्र हल्ल्यांवर देखरेख ठेवल्याची माहिती समोर आली आहे. 26 लोकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने बुधवारी मध्यरात्री (म्हणजेच 6 मे आणि 7 मे च्या मध्यरात्री) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि प्रक्षेपण स्थळांसह नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर अत्यंत अचूक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील हा एक महत्त्वपूर्ण आणि कठोर बदल मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते आणि परिस्थितीचा आढावा घेत होते.
राज्यभरात फटाके फोडून जल्लोष
भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअरस्ट्राइक केले ऑपरेशन सिंदूर नावाखाली एअरस्ट्राइक करण्यात आला करण्यात आला ह्या बातम्या समाज माध्यमावर झळकल्यानंतर पहाटेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून आपला आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरफ असे नाव देण्यात आले होते. या हल्यात 75 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत तब्बल नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. अहिल्यानगर, अकोले, पालघर, खेड, पंढरपूर, नागपूरसह अनेक ठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला तसेच भारत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.
पाकमध्ये विमानतळं, शाळा बंद, रुग्णालयात रांगा
पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच भारताने पाकिस्तानचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अनेक ठिकाणांना उद्धवस्त केले आहे. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यानंतर आता पाकिस्तानात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत पाकिस्तानच्या रस्त्यांवर भयाण शांतता आणि तणाव दिसत आहे. दरम्यान, मरयम नवाज यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत पंजाबमधील सर्व शाळा बंद राहतील, असे जाहीर केले आहे. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शाळांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने प्रमुख विमानतळांवर आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानातील अनेक विमानतळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आकाशातील विमानांची वर्दळ थांबली आहे. रुग्णालयांसमोर रांगा लागल्याचे चित्र आहे.
सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद दिवस: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पहलगाव हल्ल्याचा भारताने योग्य पद्धतीने बदला घेतला आहे. त्याबद्दल सैन्य दलाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करुयात. अतिशय योग्य पद्धतीने एअर स्टाईक करुन दहशवाद्यांचे नऊ अड्डे उद्धवस्त करण्यात आले आहेत. यावेळी दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले त्याचे संपूर्ण शुटिंग करण्यात आले आहे. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद दिवस आहे. भारतावरील हल्ला आम्ही सहन करणार नाही. त्याचा भारताने योग्य पद्धतीने बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलक आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हा फक्त एक ट्रेलर: एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानला जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिले आहे. मला वाटते की हा फक्त एक ट्रेलर आहे, पाकिस्तान आता पुढे काय होते ते पाहेल. आपला देश पाकिस्तानमधील दहशतवादाची मुळे पूर्णपणे उखडून टाकेल.
कसाब आणि हेडलीला ट्रेनिंग दिलेला तळही नष्ट
चौथा तळ भीमबर या ठिकाणचा होता, या ठिकाणीही हत्यारं होती, ट्रेनिंग दिलं जात होतं. हा तळही भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला. अब्बास कँप कोटली हा देखील उद्ध्वस्त करण्यात आला. हा कँप एलओसीपासून 13 कीि दूर आहे. फिदायिन हल्ल्यांचं प्रशिक्षण या ठिकाणाहून दिलं जात होतं. या ठिकाणी एका वेळी 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं हा तळही उद्ध्वस्त करण्यात आला. पाकिस्तानच्या सियालकोट इथला सरजल हा तळ आम्ही उद्ध्वस्त केला. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांनी या तळावर प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतर सियालकोटमधला मेहमुना कॅम्प उडवला. हा हिजबुलचा कँप होता. कठुआ या ठिकाणी दहशतवाद पसरवण्यासाठी या तळाचा उपयोग होत होता. पठाणकोटचा हल्ल्याचा कट याच तळावरुन रचला होता. मर्कस तायबा मुरिदके हा 25 किमी दूर असलेला तळ उद्ध्वस्त कऱण्यात आला आहे. 2008 मध्ये जो 26/11 चा हल्ला मुंबईवर करण्यात आला. त्यातल्या अजमल कसाबसह इतर दहशतवाद्यांनी या तळावर प्रशिक्षण घेतलं होतं. डेव्हिड हेडलीही या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये होता अशीही माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली. मरकझ सुभानअल्लाह, भागलपूर – हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून 100 किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते. अशीही माहिती कुरेशी यांनी दिली.
25 मिनिटांत 9 दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. 6-7 मे च्या मध्यरात्री भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 900 दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. मध्यरात्री भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत या कारवाईची सम्पूर्ण माहिती देण्यात आली. या कारवाईची माहिती लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांड व्योमीक सिंग यांनी दिली. त्यांनी यावेळी, त्यांच्याकडे कोणत्या लक्ष्यांच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आणि 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना देखील येथेच आखण्यात आली होती. याबद्दल विश्वसनीय माहिती आहे असे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, कोणताही नागरिक लक्ष्य होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. फक्त दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री 1:05 ते 1:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कर्नल सोफिया म्हणाल्या की, हे लक्ष्य विश्वसनीय माहितीच्या आधारे निवडण्यात आले होते आणि निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही : राज ठाकरे
पहलगाम येथे हल्ला झाला, तेव्हा मी जे पहिले ट्विट केले होते, त्यात म्हटले होते की, यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील, अशी कारवाई केली पाहिजे. परंतु, दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. अमेरिकेत दोन ट्विन टॉवर पाडले. पेंगागॉनवर त्यांनी हल्ला केला, म्हणून अमेरिकेने जाऊन काही युद्ध केले नाही. त्यांनी ते दहशतवादी ठार मारले, अशी पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
पाकिस्तानला दिला थेट इशारा
दरम्यान, एअर स्ट्राईक करताना भारतानं खूप संयम बाळगला असून पाकिस्ताननं कुरापती थांबवल्या नाहीत, तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्कराकडून विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरमार्फत दहशतवादी तळांना लक्ष्य करताना खूप संयम बाळगला आहे. पण पाकिस्ताननं जर काही आगळीक केली, तर भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. यातून परिस्थिती अधिक चिघळू शकते, अशा शब्दांत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.
या ठिकाणी झाला एअर स्ट्राईक
1) बहावलपूर
2) मुरिदके
3) गुलपूर
4) भीमबर
5) चक अमरु
6) बाग
7) कोटली
8) सियालकोट
9) मुजफ्फराबाद
विमान कंपन्यांचा निर्णय, सर्व उड्डाणे रद्द
ऑपरेशन सिंदूरफ नंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, सीमावत आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर, विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला असून, अनेक शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर देशातील अनेक विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, उड्डाणांचे वेळापत्रक तपासण्याचे आणि प्रवासाचे नियोजन बदलण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर तणाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय समुदाय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
भारताच्या तिन्ही दलांनी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सर्व अड्डे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे, असं ते म्हणाले.
भारतीय लष्कराने जशी तयारी केली होती, त्याच पद्धतीने कोणतीही चूक न करता कारवाई केली आहे. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच, संपूर्ण देश तुमच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जाते. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. ही कारवाई करायचीच होती, असं पंतप्रधान मोदी यावेळी बैठकीत म्हणाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. संपूर्ण देशाचं आमच्याकडं लक्ष होतं. भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गारही मोदींनी यावेळी काढले.
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात मुरीदकेस्थित लश्कर ए तोयबाचं मुख्यालय, बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे लाँचिंग पॅड आणि इतर महत्वाची ठिकाणे होती. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घुसून कारवाई केली. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी संरक्षण खाते, परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताच्या सुरक्षा दलांनी ६ आणि ७ मे रोजीच्या मध्यरात्री १ वाजून ०५ मिनिटांनी कारवाई सुरू केली. दीड वाजेपर्यंत हे हल्ले सुरू होते. जवळपास २५ मिनिटे ही कारवाई करण्यात आली. यात नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. २२ एप्रिलला हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या १४ दिवसांनंतर भारतानं बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, ऑपरेशन सिंदूरबद्दल दिली माहिती
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक
भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला.