निघोज । नगर सहयाद्री
सुनिल रघुनाथ पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रविण रसाळ या कुख्यात गुंडाचा जामीन अर्ज औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
अधिक माहिती अशी: कुख्यात गुंड प्रविण रसाळ व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी ४ जुलै २०१४ रोजी सुनिल रघुनाथ पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करुन जिवघेणा हल्ला केला होता. या गुन्ह्यात रसाळ व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये वैद्यकीय कारणासाठी रसाळ यास जामीन मंजूर झाला होता.
रसाळ याने जामीनावर सुटल्यावर पवार हल्ल्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची साथीदारांच्या सहाय्याने निघृण हत्या केली. त्यानुसार रसाळ याच्यावर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अहमदनगर न्यायालयाने २०१८ रोजी रसाळ याचा जामीन रद्द केला होता. त्यानंतर रसाळ याने अहमदनगर जिल्हा न्यायालय,औरंगाबाद उच्च न्यायालय व दिल्ली सर्वोच्च न्यायालयात वारंवार जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु त्याला न्यायालयाने जामीन दिला नाही.
तदनंतर आरोपी रसाळ याने नुकताच औरंगाबाद उच्च न्यायालयात 2018 साली अहमदनगर जिल्हा न्यायालयाने रद्द केलेल्या आदेशाला आव्हान देऊन पुन्हा नियमित जामीन देण्यात यावा अशी आव्हान याचिका दाखल केली होती. फिर्यादीतर्फे ज्येष्ठ वकील नारायण नरवडे यांनी बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदरील आरोपीने वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळाल्यावर केस मधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदिप वराळ यांची साथीदारांच्या मदतीने हत्या घडवून आणली आहे.
या आरोपीस पुन्हा जामीन दिल्यास इतर साक्षीदारांच्या जीवितास देखील धोका होऊ शकतो. व आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द विविध पोलिस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. म्हणून आरोपीस जामीन देण्यात येऊ नये. फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.बी.सुर्यवंशी यांनी रसाळ याचा जामीन फेटाळला. सदर प्रकरणात मूळ फिर्यादी गौरव रघुनाथ पवार यांच्या तर्फे अँड.नारायण नरवडे यांनी कामकाज पाहिले.