अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश अशोक राऊत (वय ३२ वर्ष) यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. बंटी उर्फ भावेश अशोक राऊत याच्या विरोधात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात दरोडा टाकणे, घरात घुसुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, अत्याचार करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणेे, गावठी कट्टा वापरणे असे गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुर्या व कुचकामी ठरत होत्या. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एमपीडीए कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.
त्यांनी याची पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह जिलधधिकर्यांकडे सादर केला होता. नमुद प्रस्तावाची व सोबतच्या कागदपत्रांची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पडताळणी करुन सराईत गुन्हेगार बंटी उर्फ भावेश अशोक राऊत यास स्थानबद्ध करणे बाबतचे आदेश काढले.पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई तुषार धाकराव, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, पोहेकॉ/ संदिप पवार, पोहेकॉ/शाहिद शेख, पोकॉ/ रविंद्र घुंगासे, पोकॉ/ विशाल तनपुरे, पोकॉ/ रमिझ आतार, सफौ/ महादेव भांड सर्व स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व कोतवाली पोलीस स्टेशनचे मपोहेकॉ/शिल्पा कांबळे व पोकॉ/राहुल मासाळकर यांनी केली आहे.