अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड, अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन संदिप सुधाकर थोरात व इतर संचालकांवर हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सह्याद्री ठेवीदार कृती समितीचे समन्वयक प्रा. डॉ. श्रीधर जाखुजी दरेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मदहनाची नोटीस पाठवली आहे. डॉ. दरेकर यांनी १६ जुलै २०२५ रोजी निवेदन देत संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड संस्थेच्या पदाधिकार्यांनी ठेवींचा अपहार करून जनतेच्या पैशातून जमिनी, फ्लॅट्स, वाहने विकत घेतली आहेत. त्यांनी यावर त्वरित कारवाई करून संबंधितांची खाती गोठवणे, संपत्ती जप्त करणे व पोलिस कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा केवळ इशारा नाही, तर फसवणूक झालेल्या हजारो ठेवीदारांचा आक्रोश आहे, असेही डॉ. दरेकर यांनी म्हटले आहे.
सदर नोटीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाकडे शासन व प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.